आगामी जनगणनेत OBCची स्वतंत्र जातनिहाय गणना करण्याची मागणी; राष्ट्रपतींकडे निवेदन
करमाळा (कटूसत्य वृत्त):- आगामी जनगणना २०२७ मध्ये इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची स्वतंत्र जातनिहाय गणना करण्यात यावी, यासाठी स्वतंत्र कॉलम, प्रमाणित जात कोडिंग आणि ‘मास्टर कास्ट रजिस्ट्र्री’ची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज या संघटनेच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भारताच्या संविधानातील सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आगामी जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या जातनिहाय आकडेवारीचा समावेश करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संविधानातील अनुच्छेद ३४० नुसार मागासवर्गीयांच्या स्थितीची ओळख व त्यांच्या कल्याणाची जबाबदारी राज्यावर आहे. तसेच अनुच्छेद १५(४) आणि १६(४) अंतर्गत मागासवर्गीयांना शैक्षणिक व सामाजिक विकास तसेच सार्वजनिक सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रमाणित आणि वैज्ञानिक आकडेवारी आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर इतर मागास वर्गाचा (OBC) अचूक आणि अद्ययावत जातनिहाय डेटा उपलब्ध नसल्याने संबंधित समाजासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणांचा आणि कल्याणकारी योजनांचा अपेक्षित लाभ योग्य पद्धतीने पोहोचत नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत OBC, MBC आणि घुमंतू जनजातींच्या गणनेसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे. SC/ST प्रमाणे ‘ड्रॉप डाउन मेन्यू’चा पर्याय उपलब्ध नसल्याने OBC जातींची वास्तविक आणि वैज्ञानिक आकडेवारी संकलित होण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर OBC समाजाची स्वतंत्र जातनिहाय गणना, स्वतंत्र कॉलम, प्रमाणित जात कोडिंग आणि मास्टर कास्ट रजिस्ट्र्रीसह निवेदनातील आठ प्रमुख मागण्यांचा आगामी जनगणनेच्या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचा विचार करून त्यासाठी राष्ट्रपतींनी तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहनही निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment