राज्यस्तरीय लोककला महोत्सवात हरीभाई देवकरण प्रशालेचा समूहगीत गायनात सर्वोत्कृष्ट पारितोषिकाने सन्मान
बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूरतर्फे विजेत्या संघाचा विशेष सत्कार
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय लोककला महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हरीभाई देवकरण प्रशालेच्या समूहगीत गायन संघाने लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाच्या महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकावून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूरतर्फे दिनांक २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये एकल गायन, एकल वादन, एकल नृत्य, समूहगीत गायन व समूह नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये समूहगीत गायन स्पर्धेत हरीभाई देवकरण प्रशालेच्या संघाने उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी प्रवेश मिळवला.
दिनांक २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाच्या महाअंतिम फेरीमध्ये महाराष्ट्रातील विविध शाखांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सोलापूर शाखेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरीभाई देवकरण प्रशालेच्या संघाने आपल्या प्रभावी आणि सुरेल समूहगीत सादरीकरणाने सर्वोत्कृष्ट क्रमांक पटकावला. विजेत्या संघास ₹७,००० रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल बालरंगभूमी परिषद, शाखा सोलापूर यांच्या वतीने दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी हरीभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. परिषद अध्यक्षा सौ. सीमाताई यलगुलवार व हरिभाई देवकरण प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री.सुरेशबाबू मंकणी यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा ,हरीभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रकाश कांबळे सर, प्रशिक्षक सौ.सावनी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले त्यानंतर प्रशालेच्या वतीने परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला...
यानंतर परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सौ.अर्चना अडसूळ यांनी प्रास्ताविक केले...
तर समिती प्रमुख सुभाष माने यांनी आपल्या मनोगत आहात परिषदेचे कार्य विशद केले तसेच विद्यार्थ्यांना परिषदेचे सदस्य जी विनाशुल्क आहे ते होण्यासाठी आवाहन केले व परिषदेच्या भविष्यात होणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी सांगितले...
परिषदेच्या अध्यक्षा सौ.सीमाताई श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी बाल रंगभूमी ही बालकलावंतांसाठी सदैव वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांच्यासाठी अभिव्यक्तीसाठी मंच उपलब्ध करून देणारी संस्था आहे आणि या सर्व उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले...
अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश बाबू मंकणी यांनी विद्यार्थ्यांना शालेय समितीच्या वतीने दोन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख कार्यवाह सौ. अर्चना अडसूळ, कार्याध्यक्ष श्री. पद्माकर कुलकर्णी, समिती प्रमुख श्री. सुभाष माने, उपाध्यक्ष श्री खंडू शिंदे प्रा. ज्योतिबा काटे, सहकार्यवाह श्री. संजय सावंत, श्री. मच्छिंद्र सप्ताळे, सौ. अन्नपूर्णा साखरे, श्री. सुमित फुलमामडी ,सौ माधुरी भोसले तसेच बालरंगभूमी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रशिक्षिकेचे परिश्रम तसेच पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
लोककला ही आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मातीशी जोडलेल्या भावविश्वाची ओळख आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि पारंपरिक लोककला पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने बालरंगभूमी परिषद सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. हरीभाई देवकरण प्रशालेच्या संघाने मिळवलेले हे यश या प्रयत्नांना मिळालेली प्रेरणादायी पावती ठरली आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



No comments:
Post a Comment