बबनराव म्हणाले... ‘माढ्यात भेटू!’
अमेरिकेत भेटीचे ठरले; काही मिनिटांतच कार्यक्रम बदलला, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
माढा (कटूसत्य वृत्त) : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्याभोवती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील एका रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली असून, गेल्या वर्षभरापासून ते अमेरिकेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रेमापोटी थेट अमेरिकेत जाऊन भेटूनही आले आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात माढ्याचे आमदार अभिजित पाटील काही कामानिमित्त अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत असताना त्यांनी बबनराव शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला शिंदे यांनी त्यास होकार दिल्याची माहिती आहे.
गुगल मॅप टाकण्यास सांगितले
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा बबनराव शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. भेटीसाठी येत असल्याने ‘गुगल मॅपवर लोकेशन पाठवा’, अशी विनंती त्यांनी केली. त्यालाही शिंदे यांनी होकार दिल्याचे सांगितले जाते.
मात्र, अवघ्या पंधरा मिनिटांनंतर बबनराव शिंदे यांनी पुन्हा फोन केला. डॉक्टरांकडे भेटीसाठी जायचे असल्याचे सांगत अमेरिकेतील भेटीचा कार्यक्रम रद्द केला आणि ‘आपण माढ्यातच भेटू,’ असे त्यांनी आमदार अभिजित पाटील यांना सांगितल्याची चर्चा आहे.
भेट नाकारण्यामागे कारण काय?
भेटीसाठी सुरुवातीला होकार, त्यानंतर लोकेशन पाठविण्याची तयारी आणि अवघ्या काही मिनिटांतच भेट रद्द करण्याचा निर्णय यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बबनराव शिंदे यांनी आमदार अभिजित पाटील यांची अमेरिकेत भेट नेमकी कोणत्या कारणामुळे टाळली, याबाबत माढा तालुक्यात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
मात्र, या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून अधिकृतपणे कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे ‘अमेरिकेत नाही, माढ्यातच भेटू’ या बबनराव शिंदे यांच्या भूमिकेमागचे नेमके कारण काय, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment