पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन
स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपक्रम; नेत्र तपासणीसह मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा
पंढरपूर (कटूसत्य वृत्तसेवा) : माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दहा ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २२ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या शिबिरांमध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच विविध आजारांचे निदान करण्यात येणार आहे. ही माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिवार युवा मंच, पंढरपूर यांच्या वतीने या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, शंकरराव साळवे नेत्र रुग्णालय, सोलापूर (एच. व्ही. देसाई आय इन्स्टिट्यूटचा प्रकल्प) यांच्या विशेष सहकार्याने तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मदतीने ही शिबिरे घेण्यात येणार आहेत.
तालुक्यातील विविध गावांमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑगस्ट रोजी तुंगत येथे या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी गादेगाव, १३ रोजी खर्डी, १४ रोजी उंबरे-पागे, १६ रोजी रांजणी, १८ रोजी कासेगाव, १९ रोजी रोपळे, २० रोजी पुळूज, २१ रोजी करकंब ग्रामीण रुग्णालय आणि २२ ऑगस्ट रोजी भाळवणी येथे शिबिर घेण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार असून, तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळल्यास पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रणव परिचारक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवार, १७ ऑगस्ट रोजी स्व. सुधाकरपंत परिचारक यांची पुण्यतिथी असून, त्यानिमित्त वाखरी येथे त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment