पाच वर्षांपासून मुंबईत बनावट दूध पिशव्यांचा पुरवठा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

पाच वर्षांपासून मुंबईत बनावट दूध पिशव्यांचा पुरवठा!

 पाच वर्षांपासून मुंबईत बनावट दूध पिशव्यांचा पुरवठा!

वसईतील कारखाना उद्ध्वस्त; १३ हजार बनावट पिशव्या जप्त, चौघांना अटक

मुंबई (कटूसत्य वृत्त) : नामांकित दूध कंपनीच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मूळ दूध पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून त्या पुन्हा सील करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाचे धागेदोरे वसई पूर्वेपर्यंत पोहोचले आहेत. वाळीव फाटा येथील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटसमोर बनावट दूध पिशव्या तयार करणारा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

या कारवाईत नामांकित दूध कंपनीच्या सुमारे १३ हजार बनावट रिकाम्या दूध पिशव्या तसेच भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तेलंगणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामूलू गुरुवर्य बोडपल्ली (६५), लिंगया भिक्षमया गंटा (४२), सैदुलु यादया जंगिली (३३) आणि यादया चंद्रया बतुल्ला (४६) यांचा समावेश आहे.

दहिसरमधून लागला तपासाचा धागा

गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ ने ९ जुलै रोजी दहिसर पूर्वेतील राजेश कंपाउंड, दुबे चाळ येथे छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान नामांकित कंपन्यांच्या मूळ दूध पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून त्या पुन्हा सील केल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

या ठिकाणी भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधनसामग्री तसेच बनावट दूध पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर केलेल्या तपासात या रॅकेटचे धागे वसई पूर्वेतील वाळीव फाटा परिसरापर्यंत पोहोचल्याचे उघड झाले.

वसईतील कारखान्यावर छापा

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाळीव फाटा येथील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटसमोर सुरू असलेल्या बनावट दूध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. तेथे मोठ्या प्रमाणावर बनावट रिकाम्या पिशव्यांचा साठा आढळून आला.

पोलिसांनी सुमारे १३ हजार बनावट दूध पिशव्या जप्त करून हा कारखाना उद्ध्वस्त केला. या टोळीने गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारे बनावट पिशव्यांचा पुरवठा केला असल्याचा संशय असून, या रॅकेटचा विस्तार आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपायुक्त पोलिस (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप येडे-पाटील यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages