मकाई कारखाना सुरू होणार का?
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सभासदांमध्ये संभ्रम; गाळप हंगाम तोंडावर, मात्र तयारीचा अभाव
करमाळा (कटूसत्य वृत्त) : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यानंतर आता मकाई सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणींच्या गर्तेत असलेल्या मकाई कारखान्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार का, याबाबत शेतकरी सभासदांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे.
तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ द्यायचा नाही, असा पवित्रा कारखान्याचे चेअरमन तथा आमदार नारायण पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाने घेतला आहे. मात्र, दुसरीकडे बागल गटाची एकहाती सत्ता असलेल्या मकाई सहकारी साखर कारखान्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
एनसीडीसीचा कर्जदार
मकाई सहकारी साखर कारखाना एनसीडीसी या वित्तीय संस्थेचा कर्जदार असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी अद्याप ठळकपणे दिसून येत नसल्याने सभासदांमध्ये चिंता वाढली आहे.
ऊस गाळप हंगाम तोंडावर आला असतानाही कारखाना व्यवस्थापनाकडून हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.
सभासदांच्या नजरा व्यवस्थापनाच्या भूमिकेकडे
मकाई कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गाळप हंगाम वेळेत सुरू होणे महत्त्वाचे आहे. मात्र, आर्थिक अडचणी आणि कारखान्याच्या तयारीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
त्यामुळे मकाई सहकारी साखर कारखाना यंदा प्रत्यक्षात गाळप सुरू करणार का?, कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद आणि यंत्रसामग्रीची तयारी कशी केली जाणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. कारखाना व्यवस्थापन याबाबत कधी भूमिका स्पष्ट करणार, याची प्रतीक्षा आता शेतकरी सभासदांना लागली आहे.
No comments:
Post a Comment