महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मनमानी, पक्षपाताविरोधात हेमंत पाटील आक्रमक! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मनमानी, पक्षपाताविरोधात हेमंत पाटील आक्रमक!

 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मनमानी, पक्षपाताविरोधात हेमंत पाटील आक्रमक!


महिला खेळाडूंवरील अन्यायाची चौकशी करा; मुख्य प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

पुणे(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) महिला क्रिकेट संघातील कथित मनमानी कारभार, पक्षपात, नियुक्त्यांमधील अनियमितता आणि खेळाडूंवरील अन्यायाविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी एमसीए प्रशासनाचे प्रशासक यांना सविस्तर निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मागील हंगामात अनुजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने चार ट्रॉफी जिंकल्या असतानाही त्यांचे कर्णधारपद बदलण्यात आले. हा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला, याचा खुलासा करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. वैष्णवी काळे यांचा खेळाडू म्हणून प्रदीर्घ अनुभव आणि चार वर्षांचा सहाय्यक प्रशिक्षकपदाचा अनुभव असूनही त्यांना योग्य संधी नाकारल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय चेतन पडियार यांच्याविरोधातील कथित गैरवर्तनाच्या तक्रारी, अनंत तांबवेकर यांच्याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनमधून झालेल्या कथित कारवाईचा संदर्भ, तसेच सत्यजित जाधव यांच्या BCCI लेव्हल-१ कोचिंग प्रमाणपत्राच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अजय चव्हाण आणि आशिष सूर्यवंशी यांच्या पुनर्नियुक्तीमागील निकषांचीही स्पष्टता पाटील यांच्याकडून मागण्यात आली आहे.

अनुभवी सहाय्यक प्रशिक्षक चारू कुलकर्णी यांना पदावरून हटविण्याच्या निर्णयाचा फेरआढावा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांच्यावर काही महिला खेळाडूंना अन्यायकारक वागणूक दिल्याचे, धमकावल्याचे आणि मनमानी केल्याचे आरोप असून, या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका हेमंत पाटील यांनी मांडली आहे.

कर्णधारपद बदलण्यामागील कारणे जाहीर करावीत, चारू कुलकर्णी यांच्या पदमुक्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, सर्व प्रशिक्षकांच्या पात्रतेची पडताळणी करावी, संबंधित व्यक्तींविरोधातील तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

महिला खेळाडूंच्या मेहनतीशी आणि भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. एमसीए प्रशासनाने या प्रकरणात केवळ औपचारिकता न करता ठोस कारवाई करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages