निमसाखर-बांगर्डे यांना जोडणाऱ्या नीरा नदीवरील पुलाला २५ कोटींचा निधी
इंदापूर (कटूसत्य वृत्त):- इंदापूर तालुक्यातील निमसाखर आणि माळशिरस तालुक्यातील बांगर्डे या गावांना जोडण्यासाठी नीरा नदीवर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीतून (सीआरएफ) तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या पुलामुळे दोन्ही तालुक्यांतील नागरिकांच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार असून विद्यार्थ्यांचा धोकादायक होडी प्रवास थांबणार आहे.
निमसाखर हे या भागातील प्रमुख व्यापारी केंद्र आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. येथे मोठी शैक्षणिक संकुले असल्याने आसपासच्या गावांतील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गावाच्या दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नीरा नदीच्या पलीकडे माळशिरस तालुक्यातील बांगर्डे गाव वसले आहे.
नागरिकांची वर्षानुवर्षे निकड
बांगर्डे येथील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहार आणि बाजारपेठेसाठी, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निमसाखरवर अवलंबून राहावे लागते. मात्र नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून होडीतून प्रवास करावा लागत होता. तसेच निमसाखर, दगडवाडी आणि निरवांगी परिसरातील नागरिकांना माळशिरस तालुक्यात जाण्यासाठी लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि पैसाही अपव्यय होत होता.
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निमसाखर, दगडवाडी, निरवांगी आणि बांगर्डे येथील ग्रामस्थांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पुलाची मागणी लावून धरली होती. नागरिकांची ही निकड ओळखून मंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रकल्पासाठी निधी देण्याची आग्रही मागणी केली होती.
२५ कोटींचा निधी मंजूर
मंत्री भरणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयाने निमसाखर, दगडवाडी, निरवांगी आणि बांगर्डे येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “हा पूल दोन्ही तालुक्यांतील नागरिक, शेतकरी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरेल. येत्या तीन महिन्यांत निविदा व इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे.”
दळणवळणाला गती
नवीन पूल बांधल्यानंतर निमसाखर आणि बांगर्डे यांच्यातील अंतर कमी होणार असून विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी सुरक्षित व सोयीचा मार्ग मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक, व्यापारी दळणवळण आणि आरोग्य सेवेसाठीही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाळ्यात नदी पार करण्याची गरज न राहिल्याने नागरिकांच्या अपघाताचा धोकाही कमी होणार आहे.
या प्रकल्पाच्या मंजुरीने इंदापूर-माळशिरस तालुक्यांतील नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. तीन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment