'मफलर मॅन' म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो!
म्हणाले "या व्यक्तीने घातपात केला असं.." महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप
पुणे (कटूसत्य वृत्त):- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकरणी घेतलेल्या सातव्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी 'मफलर मॅन'चा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला.
तसेच व्हीएसआर कंपनीचे मालक आणि व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, या प्रकरणात कोणाचा घातपाताचा हात असल्याचे आपण म्हणत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार म्हणाले, "दादांच्या अपघातामागचे सत्य काय आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. ते समजावे, असे आपल्या सर्वांनाच वाटते. हा अपघात होता की घातपात, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे."
या प्रकरणात काही प्रामाणिक व्यक्तींकडून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जात आहे. आतापर्यंत मिळालेली माहिती आपण पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडली आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तींनाही आपली ओळख उघड होण्याची आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती आहे. मात्र, त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी माहिती देण्याची भूमिका कायम ठेवल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
या प्रकरणात संबंधित व्यक्तीने घातपात केला, असे आपण म्हणत नसल्याचे स्पष्ट करत रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी या व्यक्तीचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे. व्ही. के. सिंग आणि व्हीएसआर कंपनीला महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचे संरक्षण मिळत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
व्ही. के. सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा करत, व्हीएसआर कंपनी आणि व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.
व्ही. के. सिंग यांच्या जयपूर येथे झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा रोहित पवार यांनी केला. या पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर सरकारने याची चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
"या सरकारने व्ही. के. सिंग आणि त्यांच्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला असला, तरी आमचे सरकार आल्यावर त्यांना सोडणार नाही. हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही," असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया किंवा तपासातून निष्कर्ष समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात आहे यावर अद्यापही चर्चा सुरू आहेत. रोहित पवार यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या, पत्रकार परिषद घेतल्या. सोमवारी देखील रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत व्ही के सिंग आणि व्हीएसआर कंपनीला वाचवणारा हा महाराष्ट्रातील एक मोठा नेता आहे असं आमचं ठाम मत असल्याचा उल्लेख केला आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी ‘राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई मंत्री यांचे व्ही के सिंग यांचे घनिष्ट संबंध असतील तर दादांना न्याय मिळणार कसा?’ असा थेट सवाल केला आहे.
काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी संबंधित एक पोस्टर लागले होते. या पोस्टरवर मफलरचा फोटो होता व या अपघाताला जबाबदार लोकांना वाचवणारा नेता कोण असा प्रश्न केला होता. त्या फोटोचा खुलासा रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. रोहित पवार यांनी 2024 ला व्हीके सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नातला देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला आहे.
हिंमत असेल तर व्हीके सिंगवर कारवाई करा
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर केल्यानंतर ‘हिंमत असेल तर व्हीके सिंग यांच्यावर कारवाई करा”, असे आव्हान केले आहे. ”राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई मंत्री यांचे व्ही के सिंग यांचे घनिष्ट संबंध असतील तर दादांना न्याय मिळणार कसा? अशा परिस्थितीत दादांना न्याय मिळेल असं मला तरी वाटत नाही. 2029 पर्यंत आम्ही वाट बघू. यात मुख्यमंत्र्यांचं काहीही घेणं देणं नसेल आणि हिंमत असेल तर व्हीएसआरवर कारवाई करून व्हीके सिंगला तुरुंगात टाकावे”, असे आव्हान रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
व्हीके सिंग यांचे 18 कोटींचे घर ?
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसातच व्हीके सिंग यांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे 18 कोटींचे घर विकत घेतले. हे घर त्यांनी कोडॅक ब्लॅक या रॅपरकडून विकत घेतले आहे. या कोडॅक ब्लॅकवर अमेरिकेत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, ड्रग्जची तस्करी करणं, दरोडा, अपहरण असे आरोप आहेत. तसेच रोनेल लुईमा या ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांसोबत व्हीके सिंग यांचे मुलगे राहुल व रोहित सिंग यांच्यासोबत संबंध आहेत.
विमानातून करतात सोन्याची तस्करी?
रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा फोटो शेअर करत त्यासोबत राहुल सिंग यांच्या एका चॅटचा फोटो देखील शेअर केला आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये राहुल सिंग हा सदर विमानातून दीड टन सोनं नेता येऊ शकते का? असा सवाल केला आहे.


No comments:
Post a Comment