जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचनेनुसार महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचनेनुसार महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम

 जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचनेनुसार महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम






सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखा तसेच तालुकास्तरावरील महसूल कार्यालयांमध्ये आज व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध तहसील कार्यालये आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कार्यालयांची तसेच परिसराची स्वच्छता केली.

जिल्हाधिकारी कार्यालय, तालुकास्तरीय महसूल कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयासह विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना शाखा, सामान्य प्रशासन शाखा तसेच अन्य विभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी संबंधित शाखांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन कक्षांची स्वच्छता करून कागदपत्रांची योग्य मांडणी, अनावश्यक साहित्याची विल्हेवाट आणि परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला.

उत्तर तहसील कार्यालय, पंढरपूर तहसील कार्यालय आणि मोहोळ तहसील कार्यालयातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या अंतर्गत भागासह बाहेरील परिसराची स्वच्छता केली. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय क्रमांक एक आणि क्रमांक दोन येथेही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्यासाठी श्रमदान केले. काही कार्यालयांमध्ये स्वच्छतेपूर्वी आणि स्वच्छतेनंतरची छायाचित्रे घेऊन मोहिमेतील बदलही नोंदविण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार सचिन लंगोटे, तहसीलदार सचिन मुळीक, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पूनम दिंडोले, तहसीलदार बालाजी बनसोडे यांच्यासह विविध महसूल कार्यालयांतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शासकीय कार्यालये ही नागरिकांच्या सेवेसाठी महत्त्वाची केंद्रे असून, ती स्वच्छ, सुंदर व नीटनेटकी असणे आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता कार्यालयीन संस्कृतीचा भाग व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेचा संदेश दिला.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक जबाबदारी, स्वच्छता आणि सार्वजनिक परिसराच्या सुयोग्य व्यवस्थापनाबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages