‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून महिला कर्मचाऱ्याच्या घरी दीपप्रज्वलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, दक्षिण सोलापूर येथे शिपाई पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी काजल कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन दीपप्रज्वलन करण्यात आले.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत मिळालेल्या लाभाच्या माध्यमातून काजल कांबळे यांना शासकीय सेवेत नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत सेवा संकल्प अभियानांतर्गत त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या शासकीय सेवेत दाखल होण्याच्या प्रवासाची माहिती जाणून घेण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन तसेच सेवा संकल्प अभियानाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुखांच्या समन्वयातून सेवा संकल्प अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध विभागांच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली समाजकल्याण विभागामार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणणे, योजनांविषयी जनजागृती करणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविणे यावर विभागाकडून विशेष भर देण्यात येत आहे.
‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांमुळे लाभार्थ्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव केला जात आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक न्याय, समान संधी, स्वावलंबन आणि शासनाप्रती विश्वासाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

No comments:
Post a Comment