सेवा संकल्प अभियानातून उत्तर सोलापूरच्या विकासकामांना गती- कुशल जैन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

सेवा संकल्प अभियानातून उत्तर सोलापूरच्या विकासकामांना गती- कुशल जैन

सेवा संकल्प अभियानातून उत्तर सोलापूरच्या विकासकामांना गती- कुशल जैन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांनी उत्तर सोलापूर तालुक्याचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात पंचायत समिती येथे संयुक्त आढावा बैठक घेण्यासह हिरज, शिवणी आणि तिऱ्हे येथे भेटी देऊन पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण, जलजीवन मिशन, घरकुल, पोषण, जलसंवर्धन आणि ग्रामविकासाच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला.

‘प्रशासन गावाच्या दारी आणि सेवा नागरिकांच्या हक्काची’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सेवा संकल्प अभियान प्रभावीपणे राबवावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाणीटंचाईवर तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश
दौऱ्याच्या प्रारंभी पंचायत समिती उत्तर सोलापूर येथे तालुक्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाणीस्रोत, संभाव्य टंचाईग्रस्त भाग तसेच पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

त्यानंतर तालुक्यातील सर्व विभागांचे खातेप्रमुख आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आवास योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच प्रलंबित घरकुलांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

हिरज येथे पोषण माह, आरोग्य शिबिर व विविध उपक्रमांची पाहणी
सेवा संकल्प अभियानांतर्गत हिरज ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

हिरज येथे राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत आयोजित उपक्रम तसेच महिला आरोग्य तपासणी शिबिराची पाहणी करण्यात आली. अंगणवाडीतील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच जलसंवर्धन, वृक्षलागवड आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली.

गावात पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते पार पडला. सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीचे दाखले वितरित करण्यात आले. शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या अभियानाच्या उद्देशाला यामुळे चालना मिळाली.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरज येथे भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली.

शिवणी येथे जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी
शिवणी ग्रामपंचायतीला भेट देऊन जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. योजनेची सद्यस्थिती, कामाची प्रगती, पाणीपुरवठ्याची उपलब्धता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

तिऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणींची दखल
तिऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. अपुऱ्या जागेमुळे आरोग्य सेवा पुरविताना निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यात आली. आरोग्य केंद्रातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद
या दौऱ्यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सेवा संकल्प अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून नागरिकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग, सहाय्यक गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, विस्तार अधिकारी (पंचायत) सोमनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages