सलगर वस्तीतील नागरिकांच्या समस्यांवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ‘ऑन द स्पॉट’ जनतेच्या दारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

सलगर वस्तीतील नागरिकांच्या समस्यांवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ‘ऑन द स्पॉट’ जनतेच्या दारी

 सलगर वस्तीतील नागरिकांच्या समस्यांवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ‘ऑन द स्पॉट’ जनतेच्या दारी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक २३ मधील सलगर वस्ती परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी संबंधित विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष परिसराची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्या जागेवरच जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
सलगर वस्ती परिसरात रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, अस्वच्छता तसेच पथदिव्यांच्या अभावामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी उपमहापौरांकडे केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत उपमहापौर देवकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छ ठिकाणांची तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच खराब रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पथदिव्यांच्या समस्यांची पाहणी करून संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देताना सांगितले की, “नागरिकांनी वारंवार तक्रारी करण्याची वेळ येता कामा नये. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविल्या गेल्या पाहिजेत. संबंधित कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.”
त्यानंतर पाटील नगर, अनुपम पार्क, स्वामी विवेकानंद भाग-२, माशाळ वस्ती, राणा प्रताप नगर तसेच सूरज प्राईड अपार्टमेंट परिसराचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी विधी व न्याय समितीचे सभापती सत्यजित वाघमोडे, उद्यान व मंडई विभागाचे सभापती राजशेखर पाटील, भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळ अध्यक्ष महेश देवकर, अक्षय वाकसे, नियंत्रण अधिकारी साय उपयुक्त सोनाली यादव मॅडम विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे अधिकारी पानगल, लाईट विभागाचे अधिकारी परदेशी, उद्यान विभागाचे अधिकारी स्वप्निल सोलनकर, दिलीप भामरे, कनिष्ठ अभियंता दीपाली चव्हाण, कनिष्ठ अभियंता देवकर, कनिष्ठ अभियंता शिंदे, आरोग्य निरीक्षक मस्के, दुड्डे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर देवकर यांनी यावेळी सांगितले, “प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. नागरिकांनी समस्या घेऊन वारंवार महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून त्यांना दिलासा देणे हीच आपली प्राथमिकता आहे.”

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages