आषाढी यात्रेनिमित्त सीपीआर व प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नानासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (सीपीआर) व प्रथमोपचार (फर्स्ट एड) विषयक एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सहयोगी संस्था इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा सोलापूर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डफरीन चौक येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सोलापूर शाखा संचलित श्रीमती गोपाबाई दमानी रक्तसंकलन केंद्रात हे प्रशिक्षण पार पडले.*
आषाढी यात्रेदरम्यान पोहता न येणे, शारीरिक थकवा, रक्तदाबातील चढ-उतार, रक्तातील साखरेचे असंतुलन, फिट येणे, अस्थमाचा झटका येणे आदी कारणांमुळे वारकरी भाविक पाण्यात पडण्याच्या किंवा बुडण्याच्या घटना घडतात. अशा वेळी तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने सीपीआर दिल्यास जीवितहानी टाळता येते.
"गेल्या चार वर्षांत सीपीआरच्या माध्यमातून आपत्ती स्वयंसेवकांनी ३० हून अधिक वारकरी भाविकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेतील बचावकार्य अधिक प्रभावी, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि समन्वयपूर्ण करण्यासाठी, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण व उजळणी व्हावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १०२ शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आपदा मित्र, आपदा सखी तसेच शहर व जिल्हा अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले."
*अमरजा थिटे, विठ्ठल चव्हाण आणि सुचेता कुलकर्णी यांनी सीपीआर व प्रथमोपचाराचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. तसेच पीपीटी व दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र बजरंग व्हाटकर, साक्षी सर्वगोड आणि रामचंद्र वाघमारे यांनी डमीच्या साहाय्याने सीपीआरची प्रात्यक्षिके सादर केली. डॉ. राजीव प्रधान यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.*
*शंकर कांबळे यांनी प्रशिक्षित स्वयंसेवकांनी समाजसेवेची भावना जोपासत आषाढी यात्रेत सेवाभावी कार्य करण्याचे आवाहन केले. तर शक्तीसागर ढोले यांनी अद्ययावत तंत्रज्ञान व प्रशिक्षणाने सज्ज स्वयंसेवक समाजरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे सांगितले.*
*समारोपप्रसंगी प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी, "सीपीआर ही संजीवनी असून योग्य वेळी शास्त्रोक्त पद्धतीने दिल्यास व्यक्तीचा जीव वाचविता येतो. त्यासाठी नियमित सराव व प्रशिक्षण आवश्यक आहे,"*असे सांगितले. *प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे सीपीआर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना प्रमाणित (सर्टिफाइड) करण्यात आले.*
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. डॉ. एन. बी. तेली यांनी केले. प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केले, तर आभार सुचेता कुलकर्णी यांनी मानले.

No comments:
Post a Comment