माढ्यात पावसाअभावी ऊस शेती संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

माढ्यात पावसाअभावी ऊस शेती संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता

 माढ्यात पावसाअभावी ऊस शेती संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता


माढा (कटूसत्य वृत्त) : पावसाने ओढ दिल्याने माढा तालुक्यातील ऊस शेतीवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यातील बहुतांश भागांत पिकांची अपेक्षित वाढ झालेली नसून जमिनीतील ओलावा कमी झाल्याने उसाची पाने सुकून होरपळू लागली आहेत. त्यामुळे यंदा एकरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
माढा तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख ऊस उत्पादक तालुक्यांपैकी एक आहे. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत उसाची वाढ खुंटली आहे. पिकांच्या वाढीवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत असून खत व औषधांची खरेदीही कमी झाल्याचे चित्र आहे.
सीना नदीकाठच्या परिसराला गेल्या वर्षी पूरस्थितीचा मोठा फटका बसला होता. यंदा मात्र पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच उजनी धरणातील पाणी वितरणाचे नियोजन वेळेत न झाल्याचा फटकाही ऊस पिकाला बसला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या उजनीतून खरीप हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सुरू झाले असले तरी आंतरमशागतीला उशिरा सुरुवात करावी लागल्याने त्याचाही परिणाम उसाच्या वाढीवर होण्याची शक्यता आहे. पावसाचा अभाव, जमिनीतील कमी होत चाललेला ओलावा आणि पाणी व्यवस्थापनातील अडचणी यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
उसाच्या उत्पादनात घट झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार असून स्थानिक बाजारपेठेवरही त्याचे आर्थिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी नियोजनाकडे तातडीने लक्ष देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages