सावंत परिवाराची लोकप्रियता ही स्व. सुभाषआण्णांच्या कार्याचीच पोचपावती- ह.भ.प. माऊली महाराज काकडे
करमाळा (कटूसत्य वृत्त):- स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त सावंत गल्ली येथील मारुती मंदिर परिसरात कीर्तन, पुष्पांजली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजप्रबोधन बाल कीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज काकडे यांनी सावंत परिवाराला मिळणारे प्रेम आणि लोकप्रियता ही स्व. सुभाषआण्णांच्या कार्याचीच पोचपावती असल्याचे प्रतिपादन केले.
स्व. सुभाषआण्णा सावंत हे करमाळा हमाल पंचायतचे संस्थापक, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. त्यांनी कष्टकरी, हमाल आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाला आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, हमाल पंचायतचे पदाधिकारी, सावंत परिवारातील सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी झालेल्या कीर्तनात ह.भ.प. माऊली महाराज काकडे यांनी स्व. सुभाषआण्णांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर स्व. सुभाषआण्णांची नात कु. जान्हवी राहुल सावंत हिने मनोगत व्यक्त करत आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. तिच्या भावनिक शब्दांमुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
यानंतर भिमराव लोंढे यांनी स्व. सुभाषआण्णांच्या जीवनावर आधारित संगीतमय कवन सादर केले. पुढे झालेल्या पुष्पांजली कार्यक्रमात मान्यवरांनी स्व. सुभाषआण्णांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे, डॉ. प्रतीजा वेदपाठक, मुख्याधिकारी सचिन तपसे आणि पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात तब्बल १७५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
कीर्तन, मनोगत, संगीतमय कवन, पुष्पांजली आणि रक्तदान अशा विविध उपक्रमांमुळे स्व. सुभाषआण्णांचा बारावा पुण्यस्मरण सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.

No comments:
Post a Comment