करमाळा तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विकासकामांचा आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

करमाळा तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विकासकामांचा आढावा

 करमाळा तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विकासकामांचा आढावा





करमाळा (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी करमाळा तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देत शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामसेवकांची आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
करमाळा येथील पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कामांचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेतील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सर्व ग्रामसेवकांना दिल्या.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी वीट येथील जलतारा प्रोजेक्टची पाहणी केली. प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, झालेली कामे आणि पुढील नियोजन याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जलसंधारण व पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या
.
त्यानंतर वीट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शाळेतील वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच शौचालयांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
शाळा परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यानंतर ग्रामपंचायत वीट येथे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जिमचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील युवक व नागरिकांना व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या जिम सुविधेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत देवीचा माळ येथे भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी देवीचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान स्थानिक पातळीवरील विविध बाबींची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
कोर्टी येथील आरोग्य केंद्रातील रुग्ण तपासणी कक्ष, औषध विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती विभाग, लसीकरण विभाग, रुग्ण नोंदणी व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
*यावेळी रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, आरोग्य केंद्रातील सर्व विभागांमध्ये स्वच्छता व शिस्त राखावी, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.
या संपूर्ण दौऱ्याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, सचिन जगताप यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages