पंढरपुरातील आपटे उपलप हायस्कूलच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीला निधी द्यावा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांची मागणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर शहरातील 114 वर्षांची उज्वल आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या 'आपटे उपलप हायस्कूल' चे बांधकाम धोकादायक बनलेले आहे. स्थापने पासून गेली 114 वर्षे या शाळेने अनेक गुणवंत, कर्तबगार विद्यार्थी घडवले असून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. परंतु, सध्या या शाळेच्या इमारतीचे बांधकाम अत्यंत मोडकळीस आले आहे. भिंतींना पडलेल्या भेगा, खचलेले छत आणि जर्जर झालेली रचना यामुळे भविष्यात कोणतीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शाळेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विशेष बाब म्हणून पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. तरी आपण या विषयात तातडीने लक्ष घालून खालील बाबींवर योग्य ती कारवाई करावी. शालेय इमारतीची तातडीने पाहणी करण्यात येवून संबंधित प्रशासकीय व बांधकाम विभागाकडून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करून घेणेसंदर्भात सुचना देणेत याव्यात.
पुनर्बाधणीसाठी निधीची तरतूद करण्यात येवून या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व जपून या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी विशेष निधी मंजूर करावा. विद्यार्थ्यांची पर्यायी सोय नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची तात्पुरती सोय दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी करण्यात यावी अशी संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना देणेत याव्यात. पंढरपूरच्या शैक्षणिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आपण या विनंतीचा प्राधान्याने विचार कराल, असा विश्वास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी निवेदनात व्यक्त केलेला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment