मंत्र्यांच्या कुत्र्यांनाही विद्यार्थ्यांपेक्षा चांगल्या सुविधा मिळतात
सरकारी शाळांच्या दुरावस्थेवरून अभिजित दीपके यांचा सरकारवर घणाघात
'राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाही बदलावं लागेल'
मुंबई (कटूसत्य वृत्त):- सरकारी शाळांच्या दुरवस्थेवरून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी राज्य सरकार आणि शिक्षण विभागावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. 'राज्यातील सरकारी शाळांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मंत्र्यांच्या कुत्र्यांना मिळतात,' असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
या दुरवस्थेला जबाबदार धरत त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत अभिजित दिपके यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या अभावावर बोट ठेवले. बहुतांश शाळांमध्ये वर्गखोल्या, बसण्यासाठी बाक, स्वच्छतागृहे आणि शाळेकडे ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते यांसारख्या मूलभूत सोयींचाही अभाव आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि जीवाचा प्रश्न आहे. राजकीय नेते विद्यार्थ्यांसाठी काहीही करत नसतील, तर जनतेने त्यांना मते का द्यावीत? लोकांनी केवळ नेत्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवण्यासाठी मते दिली आहेत का? पालकांनी आपल्या मुलांच्या शाळांची अवस्था प्रत्यक्ष पाहिली पाहिजे,” असे दीपके म्हणाले. तसेच शिक्षणावर काम केल्याशिवाय कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना मतांसाठी गावाच्या उंबरठ्यावर येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्माचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी आणि शाळांच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
गावोगाव उभारणार ‘जंतरमंतर’
शाळांमधील असुविधा आणि शिक्षणाच्या दर्जाबाबत विचारले असता दिपके म्हणाले की, “आम्ही शाळांमधील गैरसोयींविरोधात गावोगाव आंदोलन करणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे, कारण हा थेट आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. राज्यातील प्रत्येक गावात एक ‘जंतरमंतर’ उभे राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “अगोदर आम्ही महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांना भेटून जागृती करणार आहोत. त्यानंतर जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी भेटायला बोलावले, तर आम्ही नक्की जाऊ.”
दिपके यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सरकारी शाळांच्या प्रश्नावर आणि शिक्षण खात्याच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिपकेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
'पीएम केअर्स फंड'मध्ये सध्या तब्बल ८,४५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पडून आहे. एवढा मोठा निधी शिल्लक असताना त्याचा वापर जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी का केला जात नाही, असा सवाल उपस्थित करत आता 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

No comments:
Post a Comment