आम्हाला कोणी आडवे आले तर सोडणार नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 11, 2026

आम्हाला कोणी आडवे आले तर सोडणार नाही

 आम्हाला कोणी आडवे आले तर सोडणार नाही

वाटंबरे येथे मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा; २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन

सांगोला (कटूसत्य वृत्तसेवा) : “मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेले काही मंत्री आज मराठा समाजाला मिळणारे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून समाजावर अन्याय करण्याचे काम करीत आहेत. आम्ही विनाकारण कोणाचे नाव घेत नाही; मात्र आम्हाला कोणी आडवे आले तर त्याला सोडणार नाही,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आगामी २९ ऑगस्ट रोजी सराटी येथे होणाऱ्या आंदोलनासाठी मराठा समाजाने एकजुटीने सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

समाजात फूट पाडण्याचे काम शासन यंत्रणेमार्फत सुरू असल्याचा आरोप करत जरांगे-पाटील म्हणाले की, “मराठा समाजावर अन्याय झाला तर तो आम्ही कधीही सहन करणार नाही. समाजासाठी संघर्ष करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या विरोधात शासन यंत्रणेमार्फत षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.”

“आम्हीही कट्टर हिंदू आहोत; मात्र आमचे हिंदुत्व छत्रपती शिवरायांचे आहे. हिंदुत्व कोणाच्या बापाची जहागिरी नाही,” असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांचे मंगळवेढामार्गे सांगोला तालुक्यात आगमन झाल्यानंतर वाडेगाव येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वाडेगाव तसेच कडलास चौकात जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बापूसाहेब ठोकळे, कमरुद्दीन खतीब, संजय देशमुख, अरुण बिले, बाबासाहेब बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सांगोला येथील पत्रकारांच्या वतीनेही कडलास चौकात मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नागेश जोशी, संजय बाबर, दत्तात्रय खंडागळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

२९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्या या दौऱ्यामुळे सांगोला तालुक्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages