जलतरण तलावाची फी सामान्यांना परवडेना; प्रशिक्षक व जलतरणपटूंत नाराजी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

जलतरण तलावाची फी सामान्यांना परवडेना; प्रशिक्षक व जलतरणपटूंत नाराजी

 जलतरण तलावाची फी सामान्यांना परवडेना; प्रशिक्षक व जलतरणपटूंत नाराजी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या जलतरण तलावाचे खासगीकरण केल्यानंतर प्रवेश शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीमुळे शहर व परिसरातील जलतरणपटू, प्रशिक्षक तसेच हौशी पोहणाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी जलतरण तलाव परवडेनासा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महापालिकेकडून तलावाचा ठेका खासगी मक्तेदाराला देण्यात आल्यानंतर विविध बॅचेसच्या शुल्कात वाढ करण्यात आली. पूर्वी माफक दरात उपलब्ध असलेले प्रशिक्षण आता महागडे झाल्याने अनेक जलतरणपटूंनी सराव बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र यंदा वाढीव शुल्कामुळे विद्यार्थ्यांनी तलावाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांना या वाढीचा सर्वाधिक फटका बसत असून, जलतरण हा आरोग्यदायी क्रीडा प्रकार असतानाही शुल्कवाढीमुळे मुलांना या खेळापासून दूर राहावे लागत असल्याची खंत पालक व्यक्त करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर खासगीकरणाचा निर्णय पुनर्विचारात घ्यावा, तसेच मक्तेदारांकडून आकारण्यात येणारे वाढीव शुल्क कमी करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे. ठेका रद्द करून तलाव महापालिका प्रशासनानेच चालवावा, अशीही मागणी पुढे येत आहे.


 चौकट 

शहरातील तीन तलावांपैकी एक बंद

सोलापूर शहरात महापालिकेचे तीन जलतरण तलाव आहेत. त्यापैकी पार्क चौकातील मध्यवर्ती भागात असलेल्या वीर सावरकर जलतरण तलाव याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अशोक चौकातील मार्कंडेय जलतरण तलाव हा तलाव महापालिका प्रशासन चालवत असून येथे दर तुलनेने वाजवी आहेत. एक खासगी तत्वावर बांधलेला तलाव सध्या बंद अवस्थेत आहे.

खासगीकरणामध्ये पाणी फिल्टरेशनची जबाबदारीही समाविष्ट असल्याचे सांगितले जाते. वाढीव दरासंदर्भात तक्रारी आल्यास क्रीडा अधिकारी व क्रीडाप्रेमींची बैठक घेऊन आढावा घेऊन योग्य तोडगा काढू, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages