शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवड्यात रवानगी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी (वय ३७, रा. अर्धनाही, ता. मोहोळ) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत अत्यंत कठोर कारवाई केली आहे.
या कारवाईनुसार शरद कोळी यांना एका वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात फरार असलेल्या शरद कोळी यांना पोलिसांनी सांगली येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार ही स्थानबद्धतेची कारवाई निश्चित करण्यात आली. रविवारी (४ ऑक्टोबर) पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी पूर्ण करून कडक पोलीस बंदोबस्तात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
पंढरपूर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी यांच्यावर सोलापूर व आसपासच्या परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाळू चोरी आणि तस्करी, व्यापारी व नागरिकांकडे खंडणी मागणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, अशा विघातक कृत्यांची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. ‘एमपीडीए’ कायद्याच्या कलम ३(१) अन्वये पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भाषेत टीका करणारे नेते म्हणून शरद कोळी यांची ओळख आहे. आगामी विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर थेट एक वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

No comments:
Post a Comment