ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांना शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांच्या वर्षभरातील अपघातांची संपूर्ण माहिती समाज कल्याण विभागाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड, प्रादेशिक सह आयुक्त साखर यांचे प्रतिनिधी तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साखर कारखान्यांनी कामगारांची योग्य नोंदणी करणे, निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कामगारांच्या मुलांसाठी शाळा, शिक्षण तसेच आवश्यक त्या इतर सुविधा उपलब्ध होतील, यासाठी संबंधित साखर कारखान्यांनी नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

प्रत्येक साखर कारखान्यावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे-
ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची नियमित तपासणी होण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रत्येक साखर कारखान्यावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी साखर कारखाने, संबंधित विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या आरोग्य, निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मुलांचे शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आणि साखर कारखान्यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

२७ अपघात प्रकरणे प्राप्त; १७ प्रस्ताव कागदपत्रांच्या पूर्ततेसह
समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अपघात अनुदान योजनेची माहिती दिली. जिल्ह्यातील एकूण ३८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांच्या अपघातासंदर्भातील माहिती समाज कल्याण विभागाकडे सादर केली आहे. या अनुषंगाने एकूण २७ प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यापैकी १७ प्रकरणांतील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. या परिपूर्ण प्रकरणांना नियमानुसार मंजुरी द्यावी, असे सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे यांनी बैठकीत सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages