पुणे पदवीधर मतदारसंघातून मनोजकुमार गायकवाड यांचा अपक्ष अर्ज दाखल
पुणे (कटूसत्य वृत्त):- पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक अभियंता मनोजकुमार गायकवाड यांनी आज विधान भवन, पुणे येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्यासह पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही उपस्थिती लावत गायकवाड यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला.
पदवीधरांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त करत गायकवाड यांनी शिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षेतील अनियमितता, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या, पदवीधरांचे हक्क आणि युवकांच्या भवितव्याचे प्रश्न हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे राहणार असल्याचे स्पष्ट केले.
पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यासह सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांचा समावेश असल्याने गायकवाड यांच्या उमेदवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चारही जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार म्हणून मनोजकुमार गायकवाड यांनी आव्हान उभे केल्याने ही निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांची साथ मिळाल्यास गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजनाचे समीकरणही बदलू शकते.
“पदवीधरांच्या प्रश्नांसाठी केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस भूमिका आणि संघर्षाची गरज आहे,” या भूमिकेतून गायकवाड निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने आगामी काळात त्यांचा प्रचार कोणत्या मुद्द्यांभोवती केंद्रित होतो आणि पदवीधर मतदारांचा त्याला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment