चारा पिकांना प्राधान्य द्या; पाणीटंचाई असलेल्या भागांत तातडीने टँकर सुरू करा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. चारा पिकांच्या निर्मितीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून द्यावे, मुरघास खरेदीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, तसेच ज्या भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे, तेथे विनाविलंब पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशा सूचना जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी दिल्या.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत टंचाईग्रस्त भागांतील परिस्थिती, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले. चारा पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असलेले बियाणे शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे. तसेच जनावरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मुरघास खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, असे निर्देश चिवडशेट्टी यांनी दिले.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने टंचाईग्रस्त भागांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर सुरू करावेत. पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सूचित केले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते, श्रुती भोरगुंडे, सविता उंबरजे, पंचायत समिती सदस्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी मनोज राऊत आदी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण, चारा उपलब्धता आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
No comments:
Post a Comment