सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 10, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

 सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

शिवछत्रपती रंगभवन येथे बहुविभागीय सेवा शिबिर; विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विभागांचे स्टॉल




 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले आणि योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, तसेच शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे बहुविभागीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पात्र लाभार्थ्यांना विविध विभागांच्या वतीने दाखले, प्रमाणपत्रे, कार्ड आणि इतर सुविधांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विभागनिहाय स्टॉल उभारण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार शिल्पा पाटील, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग, नायब तहसीलदार श्री. बंडगर, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले की, नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. शिबिरे, सेवा मेळावे आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती व आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. अभियानांतर्गत विविध विभागांच्या 22 प्रकारच्या योजनांशी संबंधित सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय सेवांची माहिती मिळावी, यासाठी सेवाज्योत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणी बचत आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती करणारे उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार निलेश पाटील यांनी सेवा संकल्प अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. विविध विभागांच्या सेवा व योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्रे वितरित करणे आणि शासकीय सेवांचा लाभ सुलभतेने मिळवून देणे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरात महसुली दाखले, संजय गांधी योजनेची प्रमाणपत्रे, उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने नुकसानभरपाईसंदर्भातील धनादेश, उत्तर सोलापूर पंचायत समितीमार्फत बेबी केअर किट, जिल्हा आरोग्य विभागामार्फत अवयवदान प्रमाणपत्रे, आयुष्मान कार्ड आणि आयुष वंदन कार्ड आदी सुविधा पात्र लाभार्थ्यांना  वितरित करण्यात आल्या.

नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि संबंधित सेवांचा लाभ घेण्याची प्रक्रिया समजावी, यासाठी शिवछत्रपती रंगभवन येथे विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे सहा स्टॉल तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महावितरण, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा रुग्णालयामार्फत जनआरोग्य योजना, सोलापूर वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या ई-मोजणी सेवेसह इतर विभागांच्या स्टॉलचा समावेश होता. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती आणि उपलब्ध सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांनी केले.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages