महालक्ष्मी महिला पापड गृह उद्योग देणार दुष्काळग्रस्त महिलांना रोजगार
उद्योजक राजेश डोंगरे यांचा निर्धार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुनी लक्ष्मी विष्णु चाळ, डोणगांव रोड, सोलापूर येथील महालक्ष्मी महिला पापड गृह उद्योगतर्फे दुष्काळग्रस्त सुमारे 3 हजार महिलांना रोजगार देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योजक राजेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिकट परिस्थितीत सोलापूरच्या महालक्ष्मी पापड उद्योगाने माणुसकीचा हात पुढे केला आहे. 'दुष्काळ पडला म्हणून घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,' असा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील गरजवंत दोन ते तीन हजार महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे. महालक्ष्मी पापड उद्योगाच्या माध्यमातून महिलांना पापड, कुरडई, सांडगे, लोणचे तयार करण्याचे काम दिले जाणार आहे. यासाठी महिलांना कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. कच्चा माल घरपोच पोहोचवला जाईल आणि तयार झालेला माल आमचे कर्मचारी घरी येऊन घेऊन जातील. कामाचा मोबदला दर आठवड्याला रोख स्वरूपात दिला जाणार आहे.ही योजना केवळ दुष्काळापुरती नाही, तर कायमस्वरूपी रोजगाराची संधी आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, पाण्याअभावी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी आणि शेतमजूर हवालदिल झाले आहेत. बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च भागविण्याची चिंता ग्रामीण कुटुंबांना सतावत असताना, सोलापूरच्या महालक्ष्मी पापड उद्योगाने माणुसकीचा हात पुढे केला आहे. उद्योगाचे संचालक राजेश डोंगरे यांनी जिल्ह्यातील गरजू दोन ते तीन हजार महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विशेषतः उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा तालुक्यातील शेतमजूर कुटुंबातील महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या महिलांना कामाची गरज आहे अशांनी महालक्ष्मी पापड उद्योग, लक्ष्मी विष्णू चाळ, डोणगाव रोड, सोलापूर (मो.८५८५०२२९२९, ८५५२००५०५२) येथे थेट संपर्क साधावा, असे आवाहन डोंगरे यांनी केले आहे.
दुष्काळामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांचे अर्थचक्र कोलमडले असताना महिलांच्या हाताला घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम संकटग्रस्त कुटुंबांसाठी मोठा आधार ठरण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेला लक्ष्मी कांबळे, नयना चौगुले, कृष्णकांत चव्हाण, सुनिता खांडेकर उपस्थित होते.
चौकट-
“शेतकरी जगला तरच देश जगेल. आज शेतकरी अडचणीत असताना त्याच्या कुटुंबातील महिलांना आर्थिक बळ देणे ही आमची जबाबदारी आहे. ही योजना केवळ दुष्काळापुरती मर्यादित नसून, कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे राजेश डोंगरे यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment