पंधरा वर्षानंतर कळंबमध्ये युवक महोत्सवाचे आयोजन
- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास यजमानपद
- मा.कुलगुरु यांच्या हस्ते उद्घाटन
- ४८ महाविद्यालयाचे साडे चारशे कलावंत सहभागी होणार
कळंब (कटूसत्य वृत्त):-शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने धाराशिव जिल्हा युवक महोत्सवाचे यजमानपद ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास देण्यात आले आहे. १५ वर्षांनंतर कळंब शहरात १ व २ सप्टेंबर रोजी होणा-या या महोत्सवात ४८ महाविद्यालयांचे ७०० युवा कलावंत सहभागी होणार आहेत.
महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.३१) सायंकाळी युवक महोत्सवासंदर्भात माहिती देण्यासाठी मोहेकर महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, जनसंपर्क अधिकारी डॉ.संजय शिंदे, जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, सांस्कृतिक समन्वयक डॉ दत्ता साकोळे आदींसह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर म्हणाले, कळंब शहर हे कला, साहित्य व संस्कृतीची जोपासना करणारे म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सन २०११ मध्ये शिवछत्रपती महाविद्यालयात धाराशिव जिल्हास्तरीय युवक महोत्सव संपन्न झाला. आता तब्बल १५ वर्षांनंतर हा महोत्सव शहरात संपन्न होणार आहे. शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी जन्मशताब्दी वर्ष तसेच ज्ञानप्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष या निमित्ताने संस्थेचे यजमानपद स्वीकारले आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला असून चार विविध रंगमंचावर स्पर्धा होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १) सकाळी १० वाजता करण्यात येईल. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम, अधिष्ठाता डॉ.भास्कर साठे, अधिसभा सदस्य आश्लेष मोरे, डॉ.संजय कांबळे, नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तत्पुर्वी सकाळी आठ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
तर महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आमदार कैलास घाडगे पाटील व प्रख्यात रंगकर्मी डॉ.दिलीप घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर राहतील. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे, अधिसभा सदस्य देविदास पाठक, सतीश गावित यांची उपस्थिती राहील. बुधवारी (दि.दोन) दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कळंब शहर व पंचक्रोशीतील रसिकांनी युवक महोत्सवात उपस्थित राहुन सोहळयाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर व संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी केले आहे.
- ४४ महाविद्यालयाचे ४५७ कलावंत सहभागी होणार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सर्व महाविद्यालयांनी किमान पाच कला प्रकारात सहभाग, सादरीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. जी महाविद्यालये हा नियम पाळणार नाहीत त्यांना १० हजार रुपयांचा दंड व युवक महोत्सव शिर्षकाखाली जमा सर्व रक्कम विद्यापीठात जमा करावी लागणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून ४४ महाविद्यालयाचे ४५७ कलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये १६३ मुले तर २८४ मुलींचा सहभाग आहे. तर शोभायात्रेत १० संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
*पाच गटात २१ कलाप्रकार*
युवक महोत्सवात सहभागी होणा-या संघात दोन व्यवस्थापकांसह जास्तीत जास्त ४५ जणांचा संघ अपेक्षीत आहे तर संगीत, नृत्य, नाटय, वाडःमय व ललित कला अशा पाच गटात एकूण २१ कलाप्रकार सादर होणार आहेत. यासाठी मुख्य रंगमंचासह मंच उभारण्यात आले आहेत. कला गट व प्रकार पुढीलप्रमाणे :
१. संगीत विभाग - १. भारतीय शास्त्रीय गायन, २. भारतीय शास्त्रीय तालवाद्य ३. भारतीय शास्त्रीय सुरवाद्य ४.नाटयसंगीत ५. भारतीय सुगम गायन ६. भारतीय समूह गायन ७. लोक वाद्य वृंद ८.पाश्चात्य सुगम गायन ९.पाश्चात्य वाद्य वादन १०. पाश्चात्य समूह गायन.
२. नृत्य विभाग - ११. भारतीय शास्त्रीय नृत्य १२. लोक आदिवासी नृत्य
३. वाडःमय विभाग - १३. वक्तृत्व १४. वादविवाद १५. प्रश्नमंजुषा
४. नाटय विभाग - १६. नकला १७. एकांकिका १८.प्रहसन १९. मूक अभिनय
५. ललित कला विभाग - २०. रांगोळी २१. चित्रकला २२. कोलाज २३. पोस्टर २४. मृदमूर्तीकला २५. व्यंगचित्र २६. स्पॉट फोटोग्राफी २७. इन्स्टॉलेशन २८. लघुपट तसेच शोभायात्रा ही सांघिक स्पर्धा असणार आहे.

No comments:
Post a Comment