स्वातंत्र्यदिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई
ऑस्ट्रेलिया (कटूसत्य वृत्त):- ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर 360 एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याच्यासोबत इतर 3 गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8 वाजता यशस्वी चढाई पूर्ण केली व भारताचा तिरंगा फडकवला. पुण्यातील स्मिता घुगे, सांगलीचा तुषार सुभेदार व म्हैसूर येथील प्रीत हे या मोहिमेत सहभागी होते. स्मिता ने सर्वात मोठा तिरंगा फडकवात विक्रम प्रस्थापित केला. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने 2014, 2023 आणि आता 2026 या वर्षात हे शिखर सर करून तिसऱ्या वेळेस हे शिखर सर करण्याचा मान मिळवला. याशिवाय आतापर्यंत आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलिमांजारो, युरोपतील सर्वोच्च माउंट एलब्रूस व आता ऑस्ट्रेलिया मधील कोझीयस्को ही सर्व शिखरे 3 वेळा चढाई करून गिर्यारोहन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
गेले काही दिवस कोसिअस्को शिखरावर खूप जास्त प्रमाणात बर्फ पडला असून त्यामुळे चढाईवर खराब वातावरणाचे संकट होते.
तरीही 15 ऑगस्ट रोजी भारतीय तिरंगा हातात घेत माऊंट कोसिअस्कोच्या शिखरावर पोहोचून आनंद बनसोडे व टीमने यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाला अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
माऊंट कोसिअस्को ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च पर्वत आहे. जगातील सात खंडांतील सर्वोच्च शिखरांवर चढाई करण्याच्या साहसी प्रवासात कोसिअस्कोला विशेष महत्त्व आहे.
एव्हरेस्ट सर करणारे आनंद बनसोडे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 360 एक्स्पलोरर जगभरातील साहसी आणि परिवर्तनात्मक प्रवासाचे आयोजन करते.
“एके काळी स्वतः ही सर्व शिखरे सर करत होतो आता इतरांना घेऊन ही शिखरे सर करताना विशेष आनंद होत आहे. भारताचा तिरंगा जगातील सर्वोच्च आणि महत्त्वाच्या शिखरांवर अभिमानाने फडकवणे ही माझ्यासाठी केवळ गिर्यारोहणाची कामगिरी नाही, तर भारताला दिलेली एक मानवंदना आहे.” अशी भावना आनंद बनसोडे यांनी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment