कम्युनिस्ट पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 16, 2026

कम्युनिस्ट पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान

 कम्युनिस्ट पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान 

तरुण पिढीला विचारांशी जोडावे - कॉ. सुकुमार दामले 



स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही; तो आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारणारा दिवस आहे. आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालो, पण देशातील प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने अलीकडे स्वतंत्र, सुरक्षित, सन्मानाने आणि समानतेने जगतो आहे का? हा प्रश्न विचारणे म्हणजे देशविरोधी होणे नव्हे. उलट, देशाच्या भवितव्याची काळजी असलेल्या प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे असे महत्वपूर्ण विचार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ डावे विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) ज्येष्ठ नेते आणि कामगार चळवळीतील आघाडीचे व्यक्तिमत्त्व कॉ.सुकुमार दामले यांनी व्यक्त केले.
कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभादेवी शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा झेंडावंदन कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी दामले आपले विचार मांडत होते. याप्रसंगी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्रीमती कॉ. मंगला सावंत, कॉ. मधुकर कदम, कॉ. विश्वनाथ घवाळी, कॉ.
जगत नारायण मिश्रा, मिस्त्री, कॉ. एरंडेकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
दामले पुढे असेही म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून ८० वर्षे झाली. या स्वातंत्र्यामागे असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आहे. त्यात कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सामान्य जनतेच्या संघर्षाचाही मोठा वाटा आहे. कम्युनिस्ट चळवळीनेही स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांचे प्रश्न, जमीनदारीविरोध, सामाजिक समता आणि वसाहतवादविरोधी संघर्ष यांना आपल्या राजकारणाचा भाग बनवले.श्रम करणाऱ्या माणसाला त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळाला पाहिजे. कामगाराला सुरक्षित रोजगार मिळावा, शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, शिक्षण आणि आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्यात असावे, आर्थिक विषमता कमी व्हावी, जात-पात आणि धार्मिक भेदभावाला आळा बसावा आणि देशाची सार्वजनिक संपत्ती काही मोजक्या हातात केंद्रित होऊ नये. या प्रश्नांवर कम्युनिस्ट पक्ष सातत्याने भूमिका घेत आला आहे. परंतु आजच्या काळात कम्युनिस्ट पक्षांसमोरही आत्मपरीक्षणाचे आव्हान आहे.
सामान्य माणसाशी असलेला संवाद अधिक व्यापक कसा करायचा? तरुण पिढीला आपल्या विचारांशी कसे जोडायचे?डिजिटल अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, गिग इकॉनॉमी आणि बदलत्या रोजगारविश्वात कामगार चळवळीची नवी भाषा कोणती असणार?
या प्रश्नांची उत्तरे जुन्या घोषणांमध्ये नाहीत; ती नव्या वास्तवाचा अभ्यास करून शोधावी लागतील.
रवींद्र मालुसरे यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीचा इतिहास आपल्या भाषणात सांगताना सध्याच्या बजबुजपुरीच्या राजकारणात अजूनही पक्ष, कार्यकर्ते आणि युनियन टिकून आहेत त्याचे कारण पूर्वसूरिनीं संघटनेचा विचार आणि निष्ठा खोलवर रुजवली आहे. जेन झी पिढी त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरली आहे त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी जोडण्याचे काम यापुढच्या काळात करावे लागणार आहे.
एका बाजूला देशात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, डिजिटल व्यवस्था, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती होत आहे. दुसऱ्या बाजूला महागाई, रोजगाराची गुणवत्ता, शेतकऱ्यांचे उत्पन्न, असंघटित कामगारांचे प्रश्न, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च, वाढती आर्थिक विषमता असे प्रश्नही आपल्या समोर आहेत. म्हणूनच विकासाचा अर्थ केवळ मोठ्या इमारती, महामार्ग आणि तंत्रज्ञान नसून सामान्य माणसाच्या घरात सुख, तरुणांच्या हाताला काम, शेतकऱ्याला योग्य मोबदला आणि प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळणे हा खरा विकास आहे. यापुढच्या भारताकडे पाहताना आपल्याला असा भारत घडवायचा आहे जिथे विकास असेल पण विषमता नसेल; उद्योग असतील पण कामगारांचे हक्कही असतील; आधुनिक तंत्रज्ञान असेल पण माणुसकीही असेल; धार्मिक श्रद्धा असतील पण द्वेष नसेल; सत्ता असेल पण उत्तरदायित्वही असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages