दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात ५०० रुपयांची वाढ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात ५०० रुपयांची वाढ

दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात ५०० रुपयांची वाढ

पदभार स्वीकारताच सभापती श्रद्धा पवार यांचा मोठा निर्णय



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कल्याण व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारताच श्रद्धा पवार यांनी दिव्यांग बांधवांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांगांच्या त्रैमासिक उदरनिर्वाह भत्त्यात ५०० रुपयांची वाढ करत तो २ हजारांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आला असून, या निर्णयानुसार शहरातील २,८६२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ७१ लाख ५५ हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती सभापती श्रद्धा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          पदभार स्वीकारल्यानंतर दिव्यांगांना आर्थिक दिलासा देण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाला तातडीने आदेश देऊन वाढीव भत्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. या निर्णयामुळे शहरातील दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेच्या ठरावानुसार ४० ते १०० टक्के दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. दिव्यांग संस्था व संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत हा भत्ता २ हजारांवरून २ हजार ५०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील लाभार्थ्यांमध्ये अस्थिव्यंग १,४८९, कर्णबधिर २९०, मूकबधिर १२१, मतिमंद ५८८ आणि अन्य दिव्यांग ३७४ अशा एकूण २,८६२ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
           यंदाच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महानगरपालिकेने ५ टक्के दिव्यांग निधीतून ३ कोटी १० लाख रुपयांची तरतूद केली असून, मागील वर्षातील ३ लाख ४४ हजार १४८ रुपये शिल्लक निधी कॅरी फॉरवर्ड करण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याणासाठी एकूण ३ कोटी १३ लाख ४४ हजार १४८ रुपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यासाठी २ कोटी ८६ लाख २० हजार रुपये, दिव्यांगांना मालमत्ता करात ५० टक्के सवलतीसाठी १० लाख रुपये, मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षणासाठी १० लाख २४ हजार १४८ रुपये, तसेच फिजिओथेरपी केंद्रासाठी मनुष्यबळ व साहित्य खरेदीसाठी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण प्रथमच राबविण्यात येत असून सोलापूर महापालिका पहिली आहे,
महापालिका कागारासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी महापालिकेत चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना गुणवंत पुरस्कार देण्यात येणार आहे,
असे सभापती श्रद्धा पवार यांनी सांगितले. एएलआयएमसीओ या संस्थेकडून मदत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
          या पत्रकार परिषदेला नगरसेविका राजश्री दोडमणी, किरण पवार, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,  लिपिक शिवराम मोटे, माऊली आडकुर , प्रभाकर कदम आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages