स्वातंत्र्यसैनिक कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोहाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

स्वातंत्र्यसैनिक कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोहाचे आयोजन

 स्वातंत्र्यसैनिक कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोहाचे आयोजन

८ ते १७ ऑगस्टदरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्यसैनिक व सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांच्या स्मृतिदिन (८ ऑगस्ट) व जयंती (१७ ऑगस्ट) निमित्त ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ, श्री स्वामी समर्थ सहकारी सुतगिरणी (वळसंग), सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भांडार, सिद्ध-संग प्रतिष्ठान आणि कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्मृती समारोह होणार आहे.
समारंभाची सुरुवात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक सभागृह येथे सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या गुणवंत सभासद पाल्यांच्या गौरव समारंभाने होणार आहे. चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून ते करिअरविषयक मार्गदर्शनही करणार आहेत.
९ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, १२ बलुतेदार आणि श्रमजीवी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
१० ते १७ ऑगस्टदरम्यान शालेय वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, भारतीय कालगणना, भूगोल, शिक्षण, पत्रकारिता आदी विषयांवरील व्याख्याने, विज्ञान व भूगोल शिक्षक परिषद, रक्तदान शिबिर, महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी, महिलांच्या आरोग्यावर विशेष व्याख्यान, शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण व प्रदर्शन, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता 'गीतबहार' सांस्कृतिक कार्यक्रम, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, स्वातंत्र्य दिन कार्यक्रम तसेच नव्या शालेय वर्गखोल्यांचे उद्घाटन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
         १७ ऑगस्ट रोजी सकाळी विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी दुपारी ४.३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय सभागृह येथे स्मृती समारोहाचा सांगता समारंभ होणार असून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कै. वि. गु. शिवदारे यांनी सहकार, शिक्षण, समाजसेवा आणि स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा जागर या स्मृती समारोहातून केला जाणार असून नागरिकांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्र गंभीरे यांनी केले आहे.
        या पत्रकार परिषदेत प्रकाश वाले, सुचेता थोबडे, डी. एस. सुत्रावे, बाळासाहेब मुस्तारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages