लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे

लोकसंवादातून शासनाच्या योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्यास गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा – मंत्री आदिती तटकरे




मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गरजू महिला व बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेश मंडळाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी कौशल्य विकास व रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचीही माहिती नागरिकांना देण्यात आली.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे. तसेच, पोषण माहाच्या माध्यमातून शहरासह राज्यातील पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अनाथ बालकांसाठी बालकाश्रम, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना गुणवत्तेच्या आधारे मुंबई व उपनगरातील वसतिगृहांमध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग, महिलांना विविध लघुउद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभाग, शेतकरी महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, कौशल्य व रोजगार विभाग तसेच सुरक्षेसाठी गृह विभाग यांच्या समन्वयाने महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवित आहे.

ग्रामीण भागासह शहरातील महिलांनाही उद्योग सुरू करता यावेत, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. महिलांना कायदेशीर सहाय्य व सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग, बालकांच्या हक्क व सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, तसेच बालक व मातांच्या आरोग्यासह शिक्षणासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष मोगरे, सचिव सतीश फटकरे, खजिनदार सुशांत कवळे, उपाध्यक्ष विजय फटकरे, विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम, अश्विनी पुजारी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages