जरांगे पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्यात सभा; ८ व ९ ऑगस्टला आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लढा देणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे ८ व ९ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात विविध ठिकाणी इशारा सभा, बैठका आणि समाजबांधवांशी संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा निमंत्रक माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. .
मराठा समाजातील कुणबी दाखले मिळण्याच्या प्रक्रियेत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात तसेच हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि मुंबई गॅझेटमधील नोंदीप्रमाणे दाखले देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेक आंदोलने, उपोषणे आणि पाठपुरावे केले आहेत. मात्र शासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर जरांगे पाटील यांचे जनजागृती आणि संघटन बळकटीसाठी दौरे सुरू असून त्याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
जरांगे पाटील यांच्या यांच्या या दौऱ्याची सुरुवात शनिवार, ८ ऑगस्ट रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथून सकाळी १० वाजता इशारा सभेने होणार आहे. त्यानंतरची त्यांची सभा माढा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दुपारी ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पंढरपूर येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.
रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे समाजबांधवांची बैठक होणार असून त्यानंतर सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे सायंकाळी ४ वाजता जरांगे पाटील यांची इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज, सोलापूर जिल्हा यांच्यावतीने पवार यांनी केले आहे. दरम्यान,समाजाच्या मागण्यांबाबत जनजागृती निर्माण करणे, शासनावर दबाव वाढविणे आणि आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या पत्रकार परिषदेस राजन जाधव, शिवाजी चापले, सचिन तिखटे, सचिन गुंड , अमोल भोसले आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment