रक्तदानातून उभी राहिली माणुसकीची साखळी
सांगलीतील कार्यकर्त्यांनी धाव घेत पत्रकाराच्या पत्नीला दिला जीवनदायी आधार
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- संकटाच्या काळात राजकारण,पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला.टेंभुर्णी येथील पत्रकार अनिल जगताप यांच्या पत्नी सौ. रुपाली जगताप यांच्या उपचारासाठी अत्यंत तातडीने रक्ताची आवश्यकता निर्माण झाली असताना,माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांनी पुढाकार घेत अवघ्या काही तासांत रक्तदात्यांची फळी उभी करून रुग्णाला मोठा दिलासा दिला.
सौ.रुपाली जगताप या गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या.प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सुरुवातीला टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना सांगली येथील उषःकाल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तपासणीत त्यांच्या मेंदूमध्ये पाणी साचल्याचे निदान झाले. त्याचवेळी दोन्ही किडन्यांचे कार्य पूर्णपणे बंद पडल्याने अत्याधुनिक पद्धतीने डायलिसिस सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान शरीरातील रक्त व रक्तघटकांची कमतरता निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांची गरज भासू लागली. डॉक्टरांनी तातडीने अनेक रक्तदाते उपलब्ध करण्याचा सल्ला दिला.
टेंभुर्णीसारख्या शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अल्पावधीत रक्तदाते उपलब्ध करणे कठीण असल्याने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करण्यात होते. हे आवाहन रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुहास पाटील यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रा पाटील यांनी, तातडीने सागर खोत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
क्षणाचाही विलंब न लावता सागर खोत यांनी सांगली जिल्ह्यातील आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला.त्यांच्या एका आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदाते दुसऱ्या दिवशी सकाळीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सकाळपासून दुपारपर्यंत रक्तदानाची प्रक्रिया सुरू राहिली आणि आवश्यक ते रक्त व रक्तघटक उपलब्ध झाल्याने उपचार प्रक्रियेला मोठी मदत झाली.
या सामाजिक उपक्रमात अमोल हजारे,सौरभ अडसूळ,भाजप युवा मोर्चाचे वाळवा मतदारसंघ उपाध्यक्ष विशाल काटकर, उपसरपंच विजय मसुटगे,ईशुब शेख, प्रणव चौगुले,ॲड. राणा निकम,भाजप उपतालुकाप्रमुख संजय महादेव हजारे, मुबारक तांबोळी, सार्थक जाधव, शशिकांत राजाराम मस्कर आणि ओंकार आनंद गरजे यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार प्रवीण शिंदे हेही मदतीला धावून आले.
संकटाच्या क्षणी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, रक्तदानासारख्या महान कार्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतात,याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.कोणतीही अपेक्षा न ठेवता पुढे सरसावलेल्या सर्व रक्तदाते,सामाजिक कार्यकर्ते आणि समन्वयक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
पत्रकार अनिल जगताप यांच्या कुटुंबीयांनी आमदार सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत,रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुहास पाटील तसेच रक्तदानासाठी पुढे आलेल्या सर्व रक्तदाते व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. संकटाच्या काळात माणुसकीची साखळी जपणाऱ्या या कार्यकर्त्यांनी समाजासमोर सेवाभावाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. टेंभुर्णीच्या पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी योगदान देत प्रत्यक्ष जाऊन भेट दिली.

No comments:
Post a Comment