राज्यातील परिवहन विभागाच्या रखडलेल्या कामामुळे
वाहनधारक आणि व्यावसायिक चालक अडचणीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील परिवहन विभागाच्या कार्यालयांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑटोमेटेड व्हेईकल टेस्टिंग (पासिंग) ट्रॅकचे काम अपूर्ण असल्याने अनेक ठिकाणी वाहनांची फिटनेस चाचणी रखडली आहे. त्याचा थेट फटका व्यावसायिक वाहनधारक आणि चालकांना बसत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर येथील वाहनचालकांनी परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राज्यातील ५४ परिवहन कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी २७ कार्यालयांमध्ये काम अद्याप अपूर्ण असल्याचा दावा वाहनचालकांनी केला आहे. त्यामध्ये सोलापूर कार्यालयाचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पासिंग ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे अनेक वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे व्यावसायिक वाहनांची कामे खोळंबली असून वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी संबंधित काम येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
दरम्यान, वाहनधारकांनी असा दावा केला आहे की, फिटनेसची कामे रखडल्याने परिवहन विभागाचा महसूलही प्रभावित होत आहे. त्यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment