Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणूक : पाचव्या दिवशीही अर्जांचा शून्य आकडा कायम; “नवा युवा पर्व”च्या हालचालींनी राजकीय गणित हलले

 कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणूक : पाचव्या दिवशीही अर्जांचा शून्य आकडा कायम; “नवा युवा पर्व”च्या हालचालींनी राजकीय गणित हलले





कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- (अरुण कोरे):- कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीत पाचव्या दिवशीही कोणत्याही उमेदवाराने प्रत्यक्ष अर्ज दाखल न केल्याने निवडणूक प्रक्रियेतला निरुत्साह कायम राहिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले “इतर काय करतात ते पाहू” हे धोरण सर्वच पक्षांच्या गोटांत स्पष्ट जाणवत असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे.


ऑनलाईन अर्जांची संख्या मात्र वाढतेच, अर्ज दाखल करण्यात प्रत्यक्ष अनागोंदी असली तरी ऑनलाईन प्रणालीत आत्तापर्यंत, नगराध्यक्षा पदासाठी ६ अर्ज, नगरसेवक पदासाठी ३१ पुरुष व २० महिला अशा एकूण ५१ नोंदी झाल्याचे निवडणूक विभागाने प्रसिद्ध केले आहे.


नगराध्यक्षा पदावर चार महिलांची नावं सर्वाधिक चर्चेत

महिला ओबीसी राखीव असलेल्या नगराध्यक्षा पदासाठी राजकीय समीकरणं तंग झाली असून, चार महिलांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) व रिपाइं (आठवले) यांच्या संयुक्त गटातून सौ. सुरेखा निवृत्ती गोरे यांची उमेदवारी जाहीर झाली.


तर इतर पक्षांतून पुढील नावे चर्चेत, भाजप : सौ. माधवी नितीन (नाना) गोरे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : दिवंगत किंगमेकर भिसे मालक यांच्या सून सौ. जयश्री संतोष भिसे, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) व रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) : सौ. शाहीन अमीर मुलाणी / सौ. कमरुन्निसा लतीफ मुलाणी

या दोघींमधून एका नावावर उद्या एकमत होण्याची चिन्हे आहेत.


दरम्यान, सौ. वनिता सातव व सौ. सिमाताई नंदकुमार मोरे यांची नावे या शर्यतीतून मागे पडल्याचे विश्वसनीय वृत्त असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे.


शनिवार शांत; गदारोळ सोमवारी?

शनिवार व रविवार या पारंपरिक शांत दिवशी प्रत्यक्ष अर्ज येण्याची शक्यता अल्प असल्याने सोमवारचा शेवटचा दिवस अर्जांचा महापूर घेऊन येणार अशी चर्चा रंगली आहे. अनेक संभाव्य उमेदवार सोमवारीच “रणशिंग फुंकणार” असा अंदाज पक्षांतून दिला जात आहे.


“नवा युवा पर्व”ची गुप्त बैठक आणि नेत्यांची धांदल

सर्वात मोठा धक्का स्थानिक पक्ष नेत्यांना बसला तो म्हणजे, अर्ज दाखल केलेल्या तरुण उमेदवारांच्या गुप्त बैठकीचा.

नेत्यांच्या दुटप्पी, स्वार्थी आणि आपमतलबी राजकारणाविरोधात नाराज झालेल्या तरुणांनी स्वतंत्र “नवा युवा पर्व” या नावाने नव्या आघाडीचा विचार सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

या घडामोडींनी प्रस्थापित पक्षांचे समीकरणच बिघडले असून, संभाव्य बंडखोरी अनिवार्य असल्याचे जाणकार सांगतात.


मतदारांमध्ये तीव्र नाराजी कायम


सर्व पक्षांची हालचाल, ताटकळणे आणि अंतर्गत भांडणे यामुळे मतदारांमध्ये मात्र नगरपरिषद प्रशासन आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांविषयी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

“काहीही बदल झाला नाही, फक्त चेहरे बदलतात; कामे मात्र ठप्पच!” अशी समजूत नागरिकांत पसरलेली दिसत आहे.


एकंदरीत, कुर्डुवाडीत राजकीय पेच वाढत असून, अर्ज न भरण्याची ही मालिका सोमवारपर्यंत कायम राहिली तर अंतिम क्षणी होणारा गदारोळ निवडणुकीची दिशा वळवू शकतो.

Reactions

Post a Comment

0 Comments