शालार्थ घोटाळ्यात भाजपशी संबंधित शिक्षणसम्राट संजय गरुड अटकेत; १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
नाशिक / जळगाव (कटूसत्य वृत्त) सरकारी शालार्थ पोर्टलवर शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून शासनाच्या वेतन निधीची अफरातफर केल्याच्या बहुचर्चित शालार्थ घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थाचालक व भाजपशी संबंधित नेते संजय गरुड याला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, एका दिवसात तब्बल १७७ बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून संजय गरुड याला ताब्यात घेण्यात आले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अंतर्गत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुडच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थांशी संबंधित असल्याचे भासवत १५० हून अधिक शिक्षकांची बनावट प्रोफाइल तयार करण्यात आली होती. या माध्यमातून शासकीय वेतन निधीवर डल्ला मारण्यात आल्याचा संशय आहे.
१२ संस्थाचालक आणि अनेक अधिकारी रडारवर
या घोटाळ्याच्या तपासात जळगाव जिल्ह्यातील १० आणि धुळे जिल्ह्यातील २ अशा एकूण १२ शिक्षण संस्थाचालक संशयाच्या भोवऱ्यात आहेत. याशिवाय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनेक संस्थाचालकांनी मोबाईल बंद करून पलायन केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
या प्रकरणातील अटक आरोपी प्रशांत वाडीले हा विविध संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांमधील दुवा म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अनेक बडे मासे तपासाच्या जाळ्यात अडकत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१,२०० आरोपींची ओळख; पाच जण अटकेत
विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात आतापर्यंत २०० हून अधिक शाळांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच १,२०० संशयितांची ओळख पटली असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण विकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून तपास सुरू आहे.
जामनेरमधील आणखी एका शाळेची चौकशी
शेंदुर्णीतील संस्थेसोबतच जामनेर शहरातील आणखी एका शाळेतही बनावट शालार्थ आयडी तयार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.
तपासाची चाहूल लागताच जिल्ह्याबाहेर
एसआयटीने यापूर्वी अटक केलेले तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाचा केंद्रबिंदू संजय गरुड यांच्या संस्थांकडे वळला होता. तपासाची चाहूल लागताच गरुड काही दिवसांपासून जिल्ह्याबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे.
गरुड यांच्या संस्थांच्या जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यांमध्ये १५ ते २० प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये, एक वरिष्ठ महाविद्यालय आणि काही वसतिगृहे कार्यरत आहेत.
काँग्रेसमधून भाजपत प्रवेश
संजय गरुड हे पूर्वी काँग्रेसचे सक्रिय नेते होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. २०२४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, जामनेर हे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे कार्यक्षेत्र असून, गरुड यांच्या अटकेबाबत विचारले असता त्यांनी याविषयी माहिती नसल्याचे सांगितले.
या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, शालार्थ घोटाळ्याचे धागेदोरे आणखी किती दूरपर्यंत पोहोचले आहेत, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment