कुणबी जात प्रमाणपत्रासाठी टिपणी व सर्कल चौकशीची जाचक अट रद्द करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
करमाळा (कटूसत्य वृत्त):- कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत करण्यात येणारी सर्कल चौकशी व त्यानंतरची टिपणी तयार करण्याची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी दि. २० जुलै २०२६ रोजी करमाळ्याचे तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर केले असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराची सर्कलमार्फत चौकशी केली जाते. त्यानंतर टिपणी तयार करून ती प्रांत अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घ्यावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे नागरिकांना अनेक महिने शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असून, प्रमाणपत्र मिळण्यास अनावश्यक विलंब होत आहे.
भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कुणबी जात प्रमाणपत्र देताना सन १९६७ पूर्वीच्या महसूल अथवा इतर शासकीय नोंदींमधील व्यवसायाचा पुरावा ग्राह्य धरला जातो. कुटुंबातील सदस्यांच्या त्या कालावधीतील नोंदींवरून जात प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे आवश्यक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असताना पुन्हा सर्कल चौकशी व टिपणी करण्याची आवश्यकता राहत नाही, असा त्यांचा दावा आहे.
तसेच, सध्या नागरिक कोणता व्यवसाय करतात यावर जात प्रमाणपत्र दिले जात नसल्याने १९६७ पूर्वीचे पुरावे उपलब्ध असताना अतिरिक्त चौकशीची अट लावणे अनावश्यक व जाचक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही पद्धत अनेक ठिकाणी लागू नसून, संबंधित अट नियमबाह्य असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
ही जाचक अट तातडीने रद्द करून पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र सहज व विनाविलंब उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर राजुरी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे, आबासाहेब टापरे, ॲड. सविताताई शिंदे, मानसिंगराव खंडागळे, डॉ. जयंत कापडी, स्वप्निल जाधव, नानासाहेब जगताप यांच्यासह अन्य जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागणीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक तथा नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment