पुणे जिल्ह्यातील धरणांतून 71,444 क्युसेकचा विसर्ग; उजनी धरणाच्या आवकेत मोठी वाढ अटळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

पुणे जिल्ह्यातील धरणांतून 71,444 क्युसेकचा विसर्ग; उजनी धरणाच्या आवकेत मोठी वाढ अटळ

पुणे जिल्ह्यातील धरणांतून 71,444 क्युसेकचा विसर्ग; उजनी धरणाच्या आवकेत मोठी वाढ अटळ

उजनीतील उपयुक्त पाणीसाठा 63.96 टक्क्यांवर; सध्या 36,200 क्युसेक आवक, वरच्या खोऱ्यात पाऊस कायम



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-     भीमा नदीच्या वरच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणांतून मिळून 71,444 क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडले जात असून, त्यामुळे उजनी धरणाच्या आवकेत येत्या काही तासांत आणि पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जलसंपदा विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शुक्रवार (दि. 24 जुलै 2026) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या नोंदीनुसार उजनी धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा 34.27 टीएमसी (970.43 दशलक्ष घनमीटर) इतका झाला असून, तो धरणाच्या एकूण उपयुक्त क्षमतेच्या 63.96 टक्के आहे. धरणाची पाणीपातळी 495.075 मीटर, तर एकूण पाणीसाठा 97.92 टीएमसी (2773.24 दशलक्ष घनमीटर) इतका झाला आहे. धरणाच्या जलक्षेत्राचा विस्तार 288.65 चौरस किलोमीटर इतका नोंदविण्यात आला आहे.
दौंड येथील भीमा नदी मापन केंद्रावर नदीची पाणीपातळी 500.320 मीटर इतकी असून, सध्या उजनी धरणात 36,200 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. वरच्या धरणांतून सुरू असलेला मोठा विसर्ग लक्षात घेता ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणाच्या सांडव्यातून किंवा वीजगृहातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

धरणातून केवळ सिंचन व विविध योजनांसाठी नियोजित प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यानुसार मुख्य कालव्यातून 2,000 क्युसेक, उजनी-भीमा-सिना बोगद्यातून 900 क्युसेक, सिना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 280 क्युसेक आणि दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी 90 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून 9,372 क्युसेक, मुळशीतून 10,000 क्युसेक, पवना धरणातून 4,820 क्युसेक, कासारसाई धरणातून 750 क्युसेक, वडीवळे धरणातून 7,783 क्युसेक, भामा-आसखेड धरणातून 2,926 क्युसेक, चासकमान धरणातून 29,793 क्युसेक आणि घोड धरणातून 6,000 क्युसेक असा एकूण 71,444 क्युसेक विसर्ग सुरू आहे. आंद्रा धरणातून मात्र कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, भीमा नदीच्या वरच्या खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास उजनी धरणाच्या आवकेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढण्याची चिन्हे आहेत.

उजनी धरणातील वाढता पाणीसाठा सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, खरीप व रब्बी हंगामातील सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी दिलासादायक ठरत असला, तरी भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो खाली ओळ टाका 

छाया -अनिल जगताप टेंभुर्णी 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages