महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा मोठा खुलासा; सात वर्षांत ४३ हजार कोटींची उलाढाल असल्याचा ईडीचा दावा
मुंबई (कटूसत्य वृत्त) : महादेव ऑनलाइन बुक आणि त्याच्याशी संबंधित स्कायएक्सचेंज, लोटस ३६५, रेड्डी अण्णा, फेअरप्ले यांसारख्या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत तब्बल ४३ हजार ४०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा खळबळजनक दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. ईडीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बुक हे देशातील सर्वांत मोठ्या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग सिंडिकेटपैकी एक मानले जात असून, त्याचे जाळे देशभरात पसरलेले आहे.
ईडीच्या तपासानुसार, हे बेटिंग नेटवर्क फ्रँचायझी मॉडेलवर कार्यरत होते. विविध एजंट आणि उपएजंटांच्या माध्यमातून चालणाऱ्या या नेटवर्कमधून दरमहा सुमारे ४५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या माध्यमातून मिळालेला पैसा शेल कंपन्या, बनावट आर्थिक व्यवहार आणि गुंतागुंतीच्या वित्तीय साखळ्यांद्वारे वैध उत्पन्न म्हणून दाखविण्यात येत असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित तपासात ईडीने ५ जून रोजी दिल्लीतील उद्योगपती विकास गर्ग यांच्याशी संबंधित सुमारे ९४० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये निवासी घरे, जमिनी, समभाग तसेच विविध सिक्युरिटीजचा समावेश आहे.
ईडीच्या मते, स्कायएक्सचेंज प्लॅटफॉर्ममधून कथितरीत्या वळविण्यात आलेल्या निधीतून या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्डरिंग आणि बेकायदेशीर बेटिंग रॅकेटच्या तपासाला आणखी वेग आला आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये छापेमारी, अटकसत्र आणि मालमत्ता जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या असून, आता ईडीच्या या नव्या खुलाशामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची व्याप्ती आणि संबंधित व्यक्तींचा सहभाग उघड करण्यासाठी तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
No comments:
Post a Comment