११ हजारांची लाच महागात; तत्कालीन मंडल अधिकाऱ्याला ५ वर्षांची सक्तमजुरी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- शेतीच्या व्यवहारासाठी ११ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील तत्कालीन मंडल अधिकारी जगन्नाथ मारुती कुंभार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी हा निकाल दिला.
प्रकरणानुसार, तक्रारदाराच्या मुलाच्या नावावरील जमिनीसाठी ये-जा व मालवाहतुकीचा रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी गट क्रमांक ५५६ मधील सहा गुंठे शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीचा अहवाल लवकर तहसीलदारांकडे पाठविण्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी कुंभार यांनी ११ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारली होती.
या प्रकरणी ३१ मार्च २०१५ रोजी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१६ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष खटला दाखल केला. खटल्यादरम्यान चार साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला पाच वर्षांची सक्तमजुरी व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
.png)
No comments:
Post a Comment