अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली असली, तरी त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल आणि चवळी या प्रमुख खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा अक्कलकोट तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. तूर, उडीद आणि सोयाबीनचा पेरणीमध्ये मोठा वाटा असून, अपेक्षित उत्पन्नाच्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी या पिकांवर मोठी भिस्त ठेवली आहे. मात्र, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या सोयाबीनसह विविध पिके वाढीच्या, फुलोऱ्याच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोयाबीनला फुलोरा व शेंगा भरण्याच्या काळात पाण्याचा ताण बसल्यास दाणे भरण्यावर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तुरीलाही पाण्याच्या ताणाचा फटका बसण्याची शक्यता असून सूर्यफूल व इतर पिकांनाही संतुलित पावसाची आवश्यकता आहे.
तालुक्यातील काही भागांत पिके जोमाने वाढत असतानाच काही ठिकाणी पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पावसाचा मोठा खंड पडून अचानक जोरदार पाऊस झाल्यासही पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पावसाचे सातत्य आणि योग्य प्रमाण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
रोग-किडींच्या प्रादुर्भावाचीही शक्यता
पावसातील अनिश्चिततेमुळे पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करावी. कोणत्याही रोग-किडीची लक्षणे आढळल्यास कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच कीडनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
कृषी विभागाकडून मार्गदर्शन
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन व तुरीच्या उत्पादनवाढीसाठी कृषी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच विविध प्रात्यक्षिके राबविली जात आहेत. मात्र, हवामानातील वाढती अनिश्चितता ही खरीप हंगामासाठी मोठी जोखीम ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने साथ दिली नाही, तर उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment