मोहोळमध्ये गणेशोत्सवात सीसीटीव्हीची नजर; १,४०० ग्रामसुरक्षा दलातील युवक सज्ज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

मोहोळमध्ये गणेशोत्सवात सीसीटीव्हीची नजर; १,४०० ग्रामसुरक्षा दलातील युवक सज्ज

 मोहोळमध्ये गणेशोत्सवात सीसीटीव्हीची नजर; १,४०० ग्रामसुरक्षा दलातील युवक सज्ज
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोहोळ पोलिसांनी व्यापक तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दलातील सुमारे १ हजार ४०० युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशाला, गरड महाविद्यालय, बसस्थानक, दत्तनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सोलापूर चौक या महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्सवादरम्यान होणाऱ्या हालचालींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. मोहोळ बसस्थानक परिसर तसेच कुरुल रोड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
ग्रामसुरक्षा दलातील युवकांना गणेशोत्सव काळातील कर्तव्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या युवकांना काठ्या, शिट्ट्या तसेच टी-शर्ट देण्यात येणार आहेत. गर्दीचे नियोजन, नागरिकांना मदत करणे आणि पोलिसांना आवश्यक सहकार्य करणे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात बीट असून, प्रत्येक बीटच्या अंमलदारांकडून आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना सोशल मीडिया, सायबर क्राईम आणि इतर महत्त्वाच्या विषयांबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
गणेशोत्सव मंडळांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages