तालुक्यात ८७,४८४ हेक्टरमधील पिके धोक्यात
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल; सोयाबीनसह खरीप पिके करपण्याच्या मार्गावर
बार्शी (कटूसत्य वृत्त):- गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील साठवण तलाव भरून देणारा वरुणराजा यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावी अशी हजेरी लावत नसल्याने बार्शी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने तब्बल ८७,४८४ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागांत पिके माना टाकत असून सोयाबीनची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे.
ऑगस्टची २४ तारीख उलटूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. विहिरी, नद्या, नाले आणि साठवण तलाव कोरडे पडल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकटही गंभीर बनत चालले आहे.
यंदा पावसाच्या सुरुवातीच्या काळात चांगली हजेरी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे सुरुवातीला पेरणी होईल का, याची चिंता असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके टिकतील का, हा प्रश्न उभा ठाकला आहे. एल निनोचा प्रभाव किती राहणार, परतीचा पाऊस येणार का, आला तर किती बरसणार आणि जमिनीची तहान भागणार का, अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी चिंतेत आहेत.
गतवर्षी तालुक्यातील अनेक मंडलांत मुबलक पाऊस झाला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने यंदा भूजलपातळीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. अनेक शेतांमधील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. चाऱ्याअभावी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. काही शेतकरी वाळून गेलेल्या पिकांमध्ये जनावरे सोडून त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र, पावसाअभावी सोयाबीनची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने केलेली पेरणी आता वाया जाण्याचा धोका वाढला आहे.
पेरणीने ओलांडली सरासरी, मात्र पावसाने दिला दगा
बार्शी तालुक्यात यंदा खरीप पेरणीने सरासरीचा टप्पा मोठ्या प्रमाणात ओलांडला आहे. तालुक्याची खरीप पेरणीची सरासरी ७३,१७७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८७,४८४ हेक्टरवर, म्हणजेच ११९.५५ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनने आघाडी घेतली असून सरासरी ५६,४७२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत तब्बल ८२,८७५ हेक्टरवर, म्हणजेच १४६.७५ टक्के पेरणी झाली आहे. एकूण तेलबियांची पेरणी १४६.४६ टक्के झाली आहे.
दुसरीकडे कडधान्यांची पेरणी मात्र केवळ २६.९६ टक्के झाली आहे. तुरीची पेरणी २,९०१ हेक्टर, उडदाची १,३४७ हेक्टर, तर मक्याची पेरणी केवळ २३० हेक्टरवर झाली आहे.
जलयुक्तच्या कामांमुळे काही गावांना दिलासा मिळण्याची शक्यता
ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत, त्या गावांना पावसाची एखादी दमदार सर आली तरी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असल्याने किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात शिथिल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे
गतवर्षीच्या पावसाच्या पाण्यावर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था कशीबशी सुरू होती. मात्र, यंदा विहिरींनी साथ सोडण्यास सुरुवात केली आहे. नद्या-नाल्यांमध्ये पुरेसे पाणी न आल्याने त्यांची पात्रे कोरडी पडली असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. बोअरवेलची पाणीपातळी खालावली असून गावोगावी हातपंपही मोजक्या घागरी पाण्यावर आले आहेत. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास ग्रामीण भागातील पाणी प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
पर्जन्यमानाची अचूक नोंद करण्याची गरज
गतवर्षी बार्शी तालुक्यातील बहुतांश मंडलांत चांगला पाऊस झाला होता. मात्र, स्थानिक यंत्रणेकडून प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीबाबत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याची भावना आहे. गतवर्षीच्या पावसाची चुकीची आकडेवारी प्रशासनाकडे कशी पोहोचली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात शेतकरी आणि नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळताना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी पर्जन्यमानाची नोंद अचूक आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे.
पाऊस लांबत चालल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या असून, येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर बार्शी तालुक्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment