अक्कलकोट तालुक्यात १७ हजार ३१७ घरकुल लाभार्थी पात्र - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

अक्कलकोट तालुक्यात १७ हजार ३१७ घरकुल लाभार्थी पात्र

अक्कलकोट तालुक्यात १७ हजार ३१७ घरकुल लाभार्थी पात्र

१८ हजार ४१७ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण; प्रारूप प्राधान्यक्रम यादी ग्रामपंचायतींकडे

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नवीन घरकुलांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अक्कलकोट तालुक्यातील तब्बल १८ हजार ४१७ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी १७ हजार ३१७ कुटुंबे घरकुलासाठी पात्र ठरली आहेत. पात्र लाभार्थ्यांची प्रारूप प्राधान्यक्रम यादी पंचायत समितीकडे प्राप्त झाली असून ती संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठविण्यात आली आहे. ही माहिती पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी आणि गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राप्त झालेल्या प्रारूप यादीचे संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत वाचन करून त्यास मंजुरी घेण्यात येणार आहे. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांच्या संदर्भातील पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १५ मे २०२६ रोजी सातारा दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रातील नवीन घरकुलांसाठीचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पाठपुरावा करून राज्यातील घरकुलांचे सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करून घेतले.

अक्कलकोट तालुक्यात सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासन आणि राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून १७ हजार ३१७ पात्र लाभार्थ्यांची प्रारूप यादी पंचायत समितीकडे प्राप्त झाली. ही यादी आता ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली असून ग्रामसभेत तिचे वाचन केले जाणार आहे.

दरम्यान, सर्वेक्षण झालेले असतानाही प्रारूप यादीत नाव समाविष्ट झाले नसलेल्या कुटुंबांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करता येणार आहे. तसेच एखाद्या गावातील पात्र कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहिले असल्यास त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधावा. अशा लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी ग्रामपंचायत स्तरावर तयार करून ती मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी सहायक गटविकास अधिकारी अमोल मुंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चौकट : लाभार्थ्यांनी सध्या बांधकाम सुरू करू नये

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जाहीर करण्यात आलेली यादी ही प्राधान्यक्रमाची प्रारूप यादी असून ती अंतिम मंजुरीची यादी नाही. त्यामुळे यादीत नाव आलेल्या लाभार्थ्यांनी सध्या घरकुलाचे बांधकाम सुरू करू नये. केंद्र शासनाकडून घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध उद्दिष्टानुसार प्राधान्यक्रमाच्या यादीतील लाभार्थ्यांना अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामास सुरुवात करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages