साखर साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभागाची धडक मोहीम
सोलापुरात तीन मोठ्या मॉल्सच्या शाखांची तपासणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बाजारातील साखरेचे वाढते दर आणि संभाव्य कृत्रिम टंचाईच्या पार्श्वभूमीवर, साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. विशेष पथकाने मंगळवारी शहरातील तीन मोठ्या मॉल्सच्या शाखांमध्ये अचानक तपासणी केली.
नियमनानुसार मोठ्या व्यापाऱ्यांना दर शुक्रवारी त्यांच्याकडील साठ्याची अद्ययावत माहिती शासकीय संकेतस्थळावर नोंदवणे बंधनकारक असते. मॉल आणि सुपर शॉपीमध्ये ऑनलाइन नोंदवलेला साठा आणि प्रत्यक्षातील साठा यात तफावत आहे का, याची पडताळणी पथकाने केली.
या पथकात परिमंडळ अधिकारी नंदकिशोर ढोके (‘अ’ विभाग), पूनम थोरात (‘ब’ विभाग), कांचन कांबळे (‘क’ विभाग) तसेच पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद (‘ब’ विभाग), राजेश यमपुरे (‘क’ विभाग) आणि सज्जन भोसले (‘ड’ विभाग) यांचा समावेश आहे.
अनियमितता आढळल्यास कारवाईचा इशारा…
हे पथक शहर तसेच ग्रामीण भागातील घाऊक व्यापारी, सुपर शॉपी व नोंदणीकृत रिटेलर्सकडे ‘रँडम’ पद्धतीने तपासणी करत आहे. या मोहिमेचा दैनंदिन अहवाल दररोज प्रशासनाला सादर केला जाणार आहे. तपासणीदरम्यान साठ्यामध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा काळाबाजार आढळल्यास थेट दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
चौकट-
तीन ठिकाणी तपासणी
1) बुधवार पेठ, कारंबा नाका परिसर : पथकाने दुपारी अडीच वाजता मॉलच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, तिथे एकूण १४.६० क्विंटल साखरेचा साठा आढळून आला.
2) लक्ष्मी पेठ परिसर : दुपारी चार वाजता दुसऱ्या शाखेची तपासणी करण्यात आली; तेथे ३६.४१ क्विंटल साखर साठा नोंदवला गेला.
3) आसरा ब्रिज परिसर : सायंकाळी पाच वाजता तिसऱ्या शाखेत तपासणी केली असता, तिथे ३५.३८ क्विंटल साठा आढळून आला.
तपासणीदरम्यान तिन्ही ठिकाणी आढळलेला साखरेचा साठा नियमांच्या मर्यादेत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
.jpg)
No comments:
Post a Comment