19 चिमुकल्या हृदयांना मिळाले नवजीवन; CEO कुशल जैन यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

19 चिमुकल्या हृदयांना मिळाले नवजीवन; CEO कुशल जैन यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया

 19 चिमुकल्या हृदयांना मिळाले नवजीवन; CEO कुशल जैन यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या संवेदनशील पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातील गरजू बालकांना मोफत हृदयरोग शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र (DEIC), जिल्हा रुग्णालय सोलापूर आणि बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 19 बालकांवर यशस्वी हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व बालके उपचारानंतर सुखरूपपणे घरी परतली आहेत.
या उपक्रमात कुशल जैन यांनी स्वतः पुढाकार घेत पालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पालकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना उपचाराचे महत्त्व समजावून सांगितले, मनातील भीती दूर केली आणि विश्वास देत आपल्या पाल्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यास प्रोत्साहित केले.
11 ऑगस्ट 2026 रोजी 18 बालकांना मोफत हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी बसद्वारे मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यापूर्वीच्या बालकासह आतापर्यंत एकूण 19 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर बालकांची प्रकृती सुधारली असून ते पालकांसह सुखरूप घरी परतले आहेत.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे उपचारासाठी पालकांना मुंबईला जाणे, तेथे राहणे, जेवण-नाश्ता तसेच उपचारानंतरचा परतीचा प्रवास यासाठी कोणताही खर्च करावा लागला नाही. संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि DEIC केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages