मार्कंडेय रथोत्सवात साकारला जाणार खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा
श्री ओम साई प्रतिष्ठानची जय्यत तयारी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा पारंपरिक रथोत्सव यंदाही नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या रथोत्सवाचे औचित्य साधून श्री ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्याम मंदिराची भव्य व नयनरम्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाचे हे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुषार जक्का यांनी दिली.
दरवर्षी श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोलापूर शहरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. रथोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा श्री ओम साई प्रतिष्ठानने खाटूश्याम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला असून, या देखाव्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आकर्षक सजावट, धार्मिक वातावरण आणि मंदिराची प्रतिकृती यामुळे भाविकांसाठी हा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
‘हारे का सहारा’ खाटूश्यामजींची कथा
खाटूश्यामजींना भक्तांमध्ये ‘शीश के दानी’ आणि ‘हारे का सहारा’ म्हणून श्रद्धेने ओळखले जाते. महाभारतातील भीमपुत्र घटोत्कच यांचे पुत्र बर्बरीक यांनाच पुढे खाटूश्यामजी म्हणून पूजले जाते. बर्बरीक हे अत्यंत पराक्रमी तसेच धनुर्विद्येत निपुण होते. महाभारताच्या युद्धात त्यांनी नेहमी पराभूत होणाऱ्या पक्षाच्या बाजूने लढण्याची प्रतिज्ञा केली होती.
या प्रतिज्ञेमुळे युद्धाचा समतोल बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. भगवान श्रीकृष्णाने बर्बरीक यांची परीक्षा घेतली. त्यावेळी बर्बरीक यांनी स्वतःचे मस्तक दान करून सर्वोच्च त्याग केला, अशी धार्मिक आख्यायिका आहे. त्यांच्या या त्यागामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांना कलियुगात ‘श्याम’ या नावाने पूजले जाईल, असे वरदान दिले. त्यामुळे खाटूश्यामजी हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत.
सोलापूरातच राजस्थानचा अनुभव
राजस्थानमधील खाटू येथे असलेल्या प्रसिद्ध खाटूश्याम मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने जातात. मात्र यंदा सोलापूरच्या श्री मार्कंडेय रथोत्सवातच खाटूश्याम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याने सोलापूरकर भाविकांना राजस्थानला न जाता खाटूश्यामजींच्या मंदिराचा देखावा अनुभवता येणार आहे.
रथोत्सवाच्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस श्री ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुषार अण्णा जक्का, वेदश्री वेणुगोपाल जिल्ला (पंतुलु), किशोर रच्चा, निखिल जक्का, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रविण गुंडला, चेतन गट्टी, गिरीष श्रीराम, अंबादास कुडक्याल, प्रमोद जक्का यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थळ : जगदंबा चौक, तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर
रथोत्सव : शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६

No comments:
Post a Comment