११ हजार शाळा खोल्यांपैकी केवळ १४२१ खोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ६०५ वर्गखोल्यांपैकी केवळ १४२१ वर्गखोल्यांचेच स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले असून, या तपासणीत तब्बल ११६९ वर्गखोल्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे धोकादायक ठरलेल्या वर्गखोल्यांपैकी ८७७ वर्गखोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी २९२ वर्गखोल्यांचे पाडकाम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींच्या सावलीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद सोलापूरच्या अखत्यारीत २७७२ शाळा असून, या शाळांमध्ये एकूण ११ हजार ६०५ वर्गखोल्या आहेत. जुन्या आणि जीर्ण झालेल्या शाळा इमारतींची सुरक्षितता तपासण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया हाती घेण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ १४२१ वर्गखोल्यांचे ऑडिट पूर्ण झाले आहे. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण वर्गखोल्यांच्या तुलनेत अत्यल्प वर्गखोल्यांचीच संरचनात्मक तपासणी झाली आहे.
ऑडिट पूर्ण झालेल्या वर्गखोल्यांपैकी १३४६ वर्गखोल्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी शिक्षण समितीने १२४८ वर्गखोल्यांना मंजुरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १२४३ वर्गखोल्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यातील १२४२ प्रस्ताव बांधकाम विभाग एक व दोनकडे पाठविण्यात आले. पुढे १२२१ वर्गखोल्यांचे प्रस्ताव अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेनंतर ११६९ वर्गखोल्या अधिकृतपणे धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८७७ वर्गखोल्यांचे पाडकाम पूर्ण झाले आहे. मात्र, तब्बल २९२ वर्गखोल्या अजूनही पाडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या वर्गखोल्यांचा वापर सुरू असल्यास विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय आकडेवारीत माळशिरस तालुका आघाडीवर असून येथे तब्बल २७५ वर्गखोल्या धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मोहोळमध्ये १२२, तर उत्तर सोलापूरमध्ये १०८ वर्गखोल्या धोकादायक आहेत. अकलकोट तालुक्यात २५४ शाळांमध्ये ११९६ वर्गखोल्या असून त्यापैकी १३८ वर्गखोल्यांचे ऑडिट झाले आहे. बार्शी तालुक्यात १७५ शाळांमधील ८२४ वर्गखोल्यांपैकी ९५ वर्गखोल्यांचे ऑडिट पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या असून, देखभाल-दुरुस्तीअभावी त्यांच्या भिंती, छत आणि अन्य संरचनात्मक भाग कमकुवत झाल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळ्यात जुन्या इमारतींच्या छताला गळती लागणे, भिंतींना तडे जाणे अशा घटना घडत असताना धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
जिल्ह्यातील ११ हजार ६०५ वर्गखोल्यांपैकी केवळ १४२१ वर्गखोल्यांचे ऑडिट झाले असताना त्यातील तब्बल ११६९ वर्गखोल्या धोकादायक ठरल्या आहेत. त्यामुळे उर्वरित वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी पूर्ण होणार, तसेच धोकादायक घोषित झालेल्या उर्वरित २९२ वर्गखोल्यांचे पाडकाम कधी होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वर्गखोल्यांचा वापर तातडीने बंद करून त्यांचे पाडकाम पूर्ण करावे आणि त्याऐवजी नवीन वर्गखोल्यांची उभारणी करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने उर्वरित वर्गखोल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट युद्धपातळीवर पूर्ण करण्याबरोबरच धोकादायक ठरलेल्या सर्व वर्गखोल्यांचे पाडकाम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment